अनवट काही – मुंबईचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अशोक बेंडखळे

[email protected]

मुंबई सात बेटांनी बनली असून पोर्तुगीजांनी ती साष्टी तालुक्यासह (म्हणजे आताचा वांद्रय़ापासून मुलुंडपर्यंतचा भाग) इंग्रज राजाला आंदण म्हणून दिली एवढे आपल्याला माहीत असते. मात्र तिच्या इतिहासाविषयी आपण अनभिज्ञ असतो. ‘मुंबईचा वृत्तांत’ हे 1889 मध्ये आलेल्या पुस्तकात (लेखकद्वय बाळकृष्ण बापू आचार्य व मोरो विनायक शिंगणे) मुंबईचा 1400 पासून 1888 पर्यंतचा वैशिष्टय़पूर्ण इतिहास नमूद केला आहे. गोविंद नारायण माडगावकरांचे ‘मुंबईचे वर्णन’ हे या विषयावरील पहिले पुस्तक (1863) आणि त्यानंतर ‘मुंबईचा वृत्तांत’ आले. त्यामुळे आणि त्यातील माहितीमुळे या पुस्तकालाही महत्त्व आहे.

‘मुंबईचा वृत्तांत’ या पुस्तकातील माहिती आपल्या ज्ञानात बरीच भर घालते. खूप शतकांपूर्वी मुंबई आणि तिच्या आसपासचा प्रदेश दक्षिणेतील राष्ट्रकुट नावाच्या राजाच्या अमलाखाली होता. मुंबईच्या उत्कर्षाचे पहिले पर्व बिंबराजाने माहीम बेटास भेट दिल्यानंतर (साधारण 1305) मुंबईची वाढ झाल्याचे दिसते. बिंबराज हा देवगिरीच्या यादव राज घराण्यातील वीर पुरुष. बिंबराजानंतर मोगल सेनापती मलिक याने कोकण प्रांतावर स्वारी केली आणि कोकणावर मुसलमानांचा अमल स्थापित झाला (1348). 1534 मध्ये मुंबई बेटे पोर्तुगीजांनी काबीज केली. पोर्तुगीजांकडून इंग्रजांकडे आली. त्या वेळी मुंबई बेटे वसईचा भाग गणला जात. त्यांचा केवळ माहीम म्हणून उल्लेख होई. इंग्लंडच्या चार्ल्स राजाला मुंबई बेटे 1661 मध्ये विवाहाच्या वेळी आंदण देण्यात आली. त्या वेळी नकाशात केवळ साष्टी वसईचा समावेश होता. ही बेटे इंग्रज सरकारने कारभारासाठी 1668 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला दिली. आधुनिक मुंबईचा पाया गव्हर्नर नेरॉल्ड ऑगियार यांनी घातला (1670). मुंबईच्या एवढय़ा इतिहासानंतर मुंबईमधील आजही अस्तित्वात असलेली मुख्य ठिकाणे, हायकोर्ट, महानगरपालिका यांची स्थापना व  त्या वेळची वाहतूक व्यवस्था (बस, ट्राम, आगगाडी इ.), बुक सेलर्स, पुस्तकालये अशी काही माहिती खूप मौलिक म्हणून महत्त्वाची आहे.

मुंबईतील बोरीबंदरच्या पलीकडील समुद्रापासून ते चर्चगेट पुढील नरीमन पॉईंट या पूर्व-पश्चिम रेषेच्या दक्षिणेकडील रिगल सिनेमापर्यंतच्या भागाला फोर्ट किंवा कोट असे नाव पडले. नागरिकांच्या सभा भरविण्यासाठी मुंबईतील पहिली जागा म्हणजे टाऊन हॉल. 1833 मध्ये ही इमारत पूर्ण झाली. टाऊन हॉलच्या दक्षिणेकडील  इमारतीस ओल्ड हाऊस म्हणून संबोधले गेले. या इमारतींच्या पूर्वेस मुंबईचे मुख्य बंदर होते. सध्याची हायकोर्टाची इमारत एप्रिल 1878 मध्ये पूर्ण झाली. पूर्वी हायकोर्टाचे न्यायाधीश इंग्रज असत. 1864 मध्ये पहिले हिंदी न्यायाधीश आले. मुंबई हायकोर्टाचे पहिले हिंदी सरन्यायाधीश छगला हे होत.1845 च्या कायद्याप्रमाणे म्युनिसिपल फंड स्थापन झाला आणि 1865 मध्ये स्वतंत्र नगरशासन संस्था स्थापन करून मुख्य अधिकारी (कमिशनर) यांची नेमणूक झाली. तसेच 1862 मध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींचे कार्पोरेशन निर्माण झाले. याचबरोबर राजाबाई एल्फिन्स्टन कॉलेज, व्हिक्टोरिया टर्मिनस, व्हिक्टोरिया गार्डन (राणीची बाग), अल्बर्ट म्युझियम, वाळकेश्वर मंदिर, लीलावती देवीचे देऊळ, जुम्मा मशीद, माहीमचा दर्गा अशा मुंबईतील आजही अस्तित्त्वात असलेल्या महत्त्वाच्या खुणांचा इतिहास दिला आहे.

मुख्य ठिकाणांशिवाय मुंबईतील वाहतूक व्यवस्थेची खूप मनोरंजक माहिती वाचायला मिळते. आगगाडी इंग्लंडमध्ये 1832 मध्ये सुरू झाली. आपल्याकडे यायला 20 वर्षे लागली. 16 एप्रिल 1853 रोजी दुपारी साडेतीन वाजता अठरा डबे असलेली ती इंजिनांची आगगाडी 500 माणसे घेऊन बोरीबंदरहून निघून 57 मिनिटांनी ठाण्यास पोहोचली. वाफेवर चालणारी गाडी ही एक देवताच आहे अशा भावनेने लोक नमस्कार करीत वाटेवर उभे होते. ट्राम गाडय़ा 9 मे 1874 रोजी रस्त्यावर धावू लागल्या आणि त्या सुरुवातीस घोडे ओढीत. 1905 साली स्थापन झालेल्या दि बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेजने ट्राम कंपनी विकत घेतली. ट्राम गाडय़ा बंद झाल्यानंतर 25 जुलै 1926 रोजी बस सेवा सुरू झाली, तेव्हा 24 बस गाडय़ा होत्या. मुंबईत प्रथम क्रॉफर्ड मार्केटमध्ये 1882 साठी विजेचे दिवे लावण्यात आले. 1883 मध्ये 46 ठिकाणी रस्त्यावर विजेचे दिवे आले. मुंबईच्या लोकसंख्येचे आकडे मजेशीर आहेत. शहराची लोकसंख्या 1667 साली दहा हजार होती, तर 1872 साली ती 6 लाख 44 हजार एवढी झाली. चांगली बाब म्हणजे 1888 मध्ये बुक सेलर्स, पुस्तकालये (लायब्ररीज) आणि वर्तमानपत्रे, मासिके यांची संख्या आशादायक होती. गव्हर्मेंट बुक डेपो, थाकर आणि कंपनी, गोपाळ नारायण आणि कंपनी असे एकोणीस बुक डेपो होते. तसेच अठ्ठावीस पुस्तकालये होती. इंग्रजीमधून प्रसिद्ध होणारी वर्तमानपत्रे, मासिकांची संख्या चांगली होती. मासिके मराठी व गुजराती भाषेत प्रसिद्ध होत.

आजच्या मुंबई शहराचे स्वरूप एकशे चाळीस वर्षांपूर्वी कसे होते आणि त्याचा जुना इतिहास, भूगोल, रचना, चतुःसीमा, इंग्रजी अमदानातील तेथील कारभार, नागरी व्यवस्था आदी अनेक विषयांची माहिती देणारे हे पुस्तक वैशिष्टय़पूर्ण असून त्यासाठी लेखकद्वयाने घेतलेली मेहनत नक्की स्पृहनीय आहे.

                 (लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)