
>> दिव्या नेरुरकर–सौदागर
‘आपल्यात काहीही नसण्याचा’ न्यूनगंड बाळगल्याने आपण स्वतच्या क्षमता हरवून बसतो. स्वतच्या स्वतबद्दल असलेल्या अपेक्षाही ओळखता येत नाहीत अन् आपण आत्मविश्वास गमावून बसतो. म्हणूनच ‘स्व ओळख’ व्हायला हवी आणि स्वतला गुणदोषांसकट स्वीकारता यायला हवं.
मोहन (नाव बदलले आहे) त्या दिवशीही सकाळी नाश्ता न करताच चरफडत ऑफिसला निघाला होता. “काय साली रोजची कटकट आहे काकाची’’ असं म्हणत त्याने ऑफिस गाठलं. तो नेहमीपेक्षा लवकर पोहोचला असल्याने कोणी अजून ऑफिसला आलेलं नव्हतं. मोहन स्वतच्या क्युबिकलमध्ये येऊन बसला. आजूबाजूची शांतता त्याला प्रसन्न करून गेली खरी, पण काहीच वेळ. जसा तो खुर्चीला रेलून डोळे बंद करून बसला तसा त्याला सकाळचा प्रसंग डोळ्यासमोरून तरळून गेला.
‘‘अरे मूर्ख माणसा, पस्तिशी उलटून गेली तरी चहा व्यवस्थित गाळून घेण्याची अक्कल येत नाही का? सोड तू. माझा चहा आजपासून मीच बनवत जाईन. तू तुझा वेगळा घे.’’ काका रागारागाने त्याला ओरडला होता. हल्ली काकाची त्याच्याशी वादावादी ही रोजची होऊन गेली होती. काही न काही क्षुल्लक कारणावरून काका त्याच्यावर तोंडसुख घ्यायचा आणि मोहन तसाच शांतपणे सहन करायचा.
एकदा मित्राने त्याला याबद्दल हटकले असता मोहन पटकन म्हणालाही होता, “मला नाही जमत काकाला बोलायला. उगाच म्हाताऱया माणसाचा माझ्याकडून अपमान नको.’’ मात्र खरी परिस्थिती अशी होती की, तो कोणालाही त्याच्या भिडस्तपणामुळे पटकन बोलू शकत नसे. उगाच विषय का वाढवा म्हणून तो गप्प बसून रहायचा. मोहनची हिच अवस्था नोकरीमध्येही थोडय़ाफार फरकाने होती. त्याचा बॉस त्याला कधीही केव्हाही कामं करायला सांगायचा. कधी कधी मोहनला ओव्हरटाईम व्हायचा, पण तेव्हाही मुकाटपणे तो कामं करायचा. ऑफिसमध्ये त्याच्या या पडती बाजू घेण्याच्या स्वभावामुळे तो चेष्टेचा विषय पण होत होता, पण त्याच्या सुदैवाने त्याला काही ऑफिसमधील मित्रमंडळी होती, जी त्याला सांभाळून घेत होती.
मोहन हा मूळचा गावाकडला. उच्च शिक्षणासाठी आणि चांगली नोकरी म्हणून मुंबईला त्याच्या सख्ख्या काकाकडे राहायला आला होता. त्याचे आई-वडील गावीच होते. काकाही एकटा राहत असल्याने त्याने स्वतहून मोहनच्या वडिलांना त्याला इथे मुंबईला येऊ देण्याचे सांगितले होते. मोहनच्या आई-वडिलांनीही मग निर्धास्तपणे त्याला मुंबईला पाठवलं. एका वर्षातच मोहन मुंबईकर झाला, पण स्वतची मनशांती घालवून बसला.
त्या संध्याकाळीही ऑफिस संपल्यावर तो रमतगमत घरी जात होता. खरे तर काकाच्या घरात पाऊल ठेवायची त्याला इच्छाच होत नव्हती, पण जाणार कुठे हा प्रश्न होताच त्याला. म्हणून तो अनिच्छेनेच काकाच्या घरी गेला, पण जसं त्याने घरात पाऊल टाकलं तशा काकाच्या कटकटी सुरू झाल्या. “चहा का न घेता गेलास? एवढा फुकट गेला ना? जाताना बाईला पोळ्या करायच्या सांगूनही नाही गेलास. बघ ती किती पोळ्या करून गेली ते. आता कोण संपवणार एवढय़ा पोळ्या? असा कसा रे बेजबाबदार तू?’’ काका पुढे काही बोलणार एवढय़ातच मोहनच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पण तरीही त्याने पुन्हा जिभेवर ताबा ठेवला आणि तसाच आल्या पावली घराबाहेर पडला. मोहनला हा अपमान सहन नाही झाला आणि त्याने त्यातच समुद्र किनाऱयाचा रस्ता पकडला व तिथे जाऊन बसला. थोडय़ा वेळाने जसं त्याला शांत वाटलं तसा त्याने स्वतसाठी समुपदेशन घेण्याचं ठरवलं.
सत्राला आल्यावरही त्याने व्यवस्थित स्वतच्या भिडस्त स्वभाव आणि त्यामुळे होणाऱया परिणामांचे प्रसंग सांगितले. “मला भरपूर मनस्ताप होत चालला आहे. काकाच्या बोलण्याचा आणि ऑफिसमधील वरिष्ठांचा. मी माझा अजून अपमान नाही सहन करू शकत. माझा हा सगळ्यामुळे इतका कॉन्फिडन्स गेलेला आहे की, मी आज नातेवाईकांसमोर जाण्याचं टाळतोय. काकाच्या समोर तर जातही नाही.’’ मोहन सांगत होता.
मोहनशी बोलताना असं जाणवलं की, त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा आत्मविश्वास कमी होण्याचे कारण त्याचा नको तेवढा भिडस्त स्वभाव हा होता आणि जे त्याने मान्यही केले. “मला कायम असं वाटत आलंय की, मी कुठेतरी कमी पडलोय. माझं इंग्रजी तेवढं चांगलं नाही. तसंच माझी शरीरयष्टीसुद्धा सामान्य. त्यामुळे ऑफिसमध्ये दबल्यासारखं वाटत राहतं. मी माझी बाजू ठामपणे मांडू शकत नाही.’’ बोलताना मोहनचा चेहरा पडलेलाच होता. “काकासुद्धा मला खूप डॉमिनेट करतो. मला या सगळ्यांना खूप ताडताड बोलावंस वाटतं, पण कसा बोलू? काय बोलू? माझी बाजू कशी मांडू?’’
‘‘बाजू मांडायला तू काही गुन्हा केला आहेस का?’’ असं विचारताच तो स्तब्ध झाला. “नाही, पण मी कसा आहे हे त्या सगळ्यांना माहीत झालं. म्हणजे…’’ मोहनला आपली बाजू मांडता येत नव्हती. नव्हती म्हणण्यापेक्षा मला सगळ्यांनी समजूनच घ्यायला हवं आणि मला जर इतरांमधला एक व्हायचं असेल तर तसे त्याच्या नजरेत भरण्यासारखे प्रयत्न करायलाच हवेत. अशा काहीशा अतार्किक विचारांचा परिणाम त्याच्यावर होऊन मोहन आत्मविश्वास गमावून बसला होताच. शिवाय ‘आपल्यात काहीही नसण्याचा न्यूनगंड‘ बाळगून बसला होता. या सर्वाचा परिणाम असा झाला की, तो स्वतच्या क्षमता आणि स्वतच्या स्वतबद्दल असलेल्या अपेक्षा ओळखूही शकत नव्हता. म्हणूनच मोहनच्या सत्राची पहिली पायरी म्हणून त्याला ‘स्व ओळख’ म्हणजे काय हे सांगितलं गेलं, ज्यामध्ये स्वतला गुणदोषांसकट कसं स्वीकारायचं याचंही मार्गदर्शन करण्यात आलं.
मोहनच्या चालू सत्रांमध्ये हेही लक्षात आलं की, तो स्वतच्या कमतरता बघूच शकत नव्हता. त्याच्यामते इतरांमुळे त्याला ही सवय लागली होती. “मला इतर कायम कमी समजतात म्हणून मी कमी आहे आणि म्हणूनच मी अपयशी आहे,’’ असं जेव्हा तो म्हणाला तेव्हा त्याला हे लक्षात आणून दिलं गेलं की, “इतर लोकांप्रमाणे जर तू स्वतला बघणार असशील तर असाच अपयशाचा विचार करून राहणार आहेस का? ते तुला जमेल का?’’
‘‘नाही’’ मोहन पटकन उत्तरला. “मी निश्चितच वेगळा आहे. आणि मला हे दाखवून द्यायचंय. म्हणूनच मी इथे येतोय न.’’
‘‘बरोबर. म्हणजेच तुलाही हे पटत नाही ना. मग इतरांचा विचार करण्याआधी तू स्वत स्वतचा विचार केलास तर?’’ हे विचारल्यावर तो समाधानाने हसला. “नक्कीच मॅम. मी आधी स्वतचा विचार करून बघतो.’’ मग त्याला अतार्किक विचार बदलण्यासाठी काही पद्धती दिल्या गेल्या, ज्या स्वतचे येणारे अवास्तवी आणि अतार्किक विचारांना प्रतिबंधित करू शकत होत्या. जसे की, मला हे विचार स्वतच्या मानसिक स्वास्थ्यासाठी लाभदायक आहेत का? या विचारांचा उपयोग आहे का? माझे हे विचार वास्तवाला धरून आहेत का?
बऱयाच सत्रानंतर मोहनमध्ये फरक पडत चालला होता. त्याला आता जाणीव होत होती की, त्याला स्वतला सिद्ध करण्यासाठी भाषेची गरज नव्हती तर गरज होती ती स्वतच स्वतला ओळखण्याची आणि स्वीकारण्याचीही! म्हणूनच त्याचा टप्पा म्हणून त्याने ऑफिसमध्ये आत्मविश्वासाने वावरायला सुरुवात केलीच. शिवाय इतर मित्रपरिवारही वाढवला, ज्यायोगे एकटेपणा त्याला वाटणार नाही. अशाच एकेदिवशी त्याने काकाशी बोलताना त्याच्या मर्यादा त्याला शांतपणे समजावल्या. मोहनची भीड चेपली होती.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)