
>> रविप्रकाश कुलकर्णी
कुठल्या तरी कारणामुळे ढवळे ग्रंथयात्रेबरोबर बेळगावला जाणं झालं. तेव्हा ‘एक सुन्न भाऊसाहेब’ लिहिणाऱया गोमेद या लेखकाची आणि ते प्रकाशित करणाऱया प्रकाशकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. रघुवीर ढवळे यांना कशालाही नाही म्हणणं ठाऊकच नाही. त्यांनी त्यांच्याकडच्या मुलाला सांगितलं, ‘अरे रमेश, ह्यांना जवळकरांकडे सोड.’
हा रमेशदेखील थोरच. एका कोपऱयावर नेऊन एकीकडे बोट दाखवत मला तो म्हणाला, ‘हे समोर दिसतंय ना, तेच जवळकरांचे दुकान!’ (हाच रमेश पुढे अक्षरधाराचा रमेश राठीवडेकर म्हणून सुविख्यात झाला.) तर मी त्या दुकानात जाऊन म्हटलं, ‘मला जवळकरांना भेटायचंय.’ दुकानातल्या गृहस्थाने बोट दाखवत म्हटलं, ‘या जिन्याने वर जा, मी आलोच.’ मी जिन्याने वर गेलो, तो समोर मगाचेच गृहस्थ हजर! अरे, आता हे गृहस्थ मला वर जा म्हणाले आणि माझ्या आधी समोर कसे काय हजर? माझी त्रेधातिरपिटच उडाली.. असं सगळं होत असताना जिन्यातून मला खाली भेटलेले गृहस्थ वर येत होते. त्यांना असल्या प्रसंगाची सवय असावी. ते म्हणाले, हा माझा जुळा भाऊ. तोपर्यंत जुळ्या भावांमुळे झालेले आणि त्यांनी केलेले गोंधळ ‘राम और श्याम’सारख्या चित्रपटातील डबल रोल पाहून माहीत होते, पण प्रत्यक्षात एवढे सारखे जुळे अशाप्रकारे प्रथमच मी पाहात होतो. नव्हे, अनुभवत होतो. हेच ते प्रकाशक जवळकर नव्हे तर प्रकाशक जवळकर बंधू! अख्या जगात प्रकाशन क्षेत्रात असलेले जवळकर बंधू हे एकमेव उदाहरण!
एकनाथ आणि विनायक या जवळकर बंधूंनी सुरुवातीला बेळगावात घरोघरी पुस्तक नेऊन देण्याचे वाचनालय सुरू केले. इथे बस्तान बसताच त्यांनी बाजारपेठेत जागा घेऊन वाचनालय सुरू केले. तसंच मागणी येईल तशी ते पुस्तकंदेखील आणून देऊ लागले. तत्पर सेवेमुळे जवळकरांकडे मराठी पुस्तकांची मागणी वाढू लागली. परिणामी त्यांनी मग पुस्तकाचे दुकान सुरू केले. हा पण व्याप वाढताच त्यांनी प्रकाशन सुरू केले, ते म्हणजे नव साहित्य प्रकाशन. हे प्रकाशन ठळकपणे लक्षात आले ते ‘एक सुंन्न साहेब’- गोमेद यांच्या विडंबनपर कादंबरीमुळे. त्याला पु. ल. देशपांडे यांची नामी प्रस्तावना होती. पुढे जवळकरांनी नव साहित्य प्रकाशन बंद केले, कारण बहुदा त्याच नावाचे दुसरे प्रकाशन आधी होते. त्यानंतर त्यांनी पारख प्रकाशन सुरू केले. ज्ञानेश्वर मुळे यांचे आत्मकथन माती, पंख आणि आकाश, भीमराव गस्ती यांचे बेरड, इत्यादी. या यादीत एक पुस्तक बहुचर्चित ठरले ते म्हणजे विद्या सप्रे- चौधरी यांचं जी. ए. कुलकर्णी संबंधात असलेले – गूढ यात्री.
त्यानंतर त्यांनी प्रकाशनाचा व्याप आवरता घेतला आणि एक दिवशी बंद करून टाकला. सर्व लक्ष पुस्तकविक्रीवर केंद्रित केलं. हिंदी, मराठी, इंग्लिश कुठलंही पुस्तक मिळण्याचे एकमेव ठिकाण असा त्यांचा बेळगावात लौकिक झाला आणि तो त्यांनी टिकवून ठेवला आहे. प्रकाशन क्षेत्रातील एकमेव जुळे असलेल्या जवळकर बंधूंपैकी एकनाथ जवळकर यांचे वयोपरत्वे निधन झाले हे वृत्त कळले. आठवणींचे पक्षी भिरभरायला लागले… त्यांना श्रद्धांजली!



























































