
>> डॉ. मीनाक्षी पाटील
संस्कृती विकसनाच्या प्रदीर्घ प्रवासात सुरुवातीपासूनच निसर्गातील चैतन्याची पूजा करताना वैश्विक एकात्मतेचे भानही विकसित होत गेल्यामुळे आदिम प्रकृतीचे चैतन्य पुरुषाशी द्वंद्वात्मक नाते कायमचे जुळलेले दिसते.
आदिम काळापासून निसर्गातल्या विविध शक्तींशी संघर्ष करीत मनुष्यजातीचा प्रवास सुरू आहे. या प्रदीर्घ प्रवासात वेळावेळी माणसाने कधी संघर्ष, कधी संवाद तर कधी समन्वय साधत मार्गक्रमणा केलेली दिसते. आदिम माणसाचे जगणे हे निसर्गाशी अगदी एकरूप झालेले होते. आदिम काळातला माणूस प्राण्यांची शिकार करण्यापूर्वी गुहांमधल्या भिंतींवर प्राण्यांची चित्रे रंगवून त्यांच्यावर भावनिक समजुती आरोपित करायचा (मांत्रिक विधी?) त्याला यातुविद्या किंवा शामनविधी म्हटले गेले. मुळात गुहांच्या छतांवर, भिंतींवर चित्र रंगवणं हा मंत्रविधीचाच भाग होता व त्यामागे त्या प्राण्याची शक्ती आपल्याला मिळून तो शक्तिविहीन झाल्यामुळे आपण त्याची सहज शिकार करू शकू, आत्मबळ वाढवू शकू हा आदिमानवाचा त्यामागील भाव.
आदिमानवाच्या या जीवनसंघर्षात तो निसर्गातल्या विविध शक्तींशी लढत असतानाच त्याला स्त्राrमधील सर्जनशीलतेचाही परिचय झाला व पुढे कृषिसंस्कृती कालखंडात स्त्राrतत्त्वाचे हळूहळू मातृकामूर्तीत रूपांतर झाले. जगभरच्या विविध संस्कृतींमध्ये स्त्राrमधील या सर्जकशक्तीला फार विविध पद्धतीने पाहिले गेले व त्याचा परिणाम म्हणून जननफलनाची प्रतीकरूप शिल्पे, मातृकामूर्ती जगभर सापडतात. भारतीय संस्कृतीत तर स्त्रीची सर्जनशीलता विचारात घेऊन तिचे मातीशी, पृथ्वीतत्त्वाशी, जडत्वाशी असलेले साधर्म्य पाहून तिला शक्ती , प्रकृती म्हटले गेले. ग्रामीण भागात तर आजही ग्रामदेवता म्हणून स्त्राrतत्त्वाचे पूजन केले जाते. भारतीय तत्त्वविचारातील सांख्य तत्त्वज्ञानात तिला ‘प्रकृती’ म्हणून जसे अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच तांत्रिक पंथातही आहे. संस्कृती विकसनाच्या पुढील काळात भारतीय संस्कृतीविचारात स्त्राrतील सर्जनशीलतेला पूरक ठरणारे चैतन्य म्हणून तिला पुरुषतत्त्वाची जोड देऊन ‘प्रकृती-पुरुष’ या द्वंद्वाला विशेष महत्त्व आलेले दिसते, जे अतिपूर्वेकडील ताओ पंथात ‘यिन आणि यांग’ या जोडीलाही दिसते. युरोपातील अल्केमीमध्येही स्त्री व पुरुष तत्त्वाला जड व चेतन तत्त्व म्हणूनच पाहिले गेले आहे. मानसशास्त्रातही हे द्वंद्व जड-चेतन, अनिमा-अनिमस म्हणून स्वीकारले गेले आहे. ताओ, तंत्र व आल्केमी या पंथांनी जड व चेतनाचा विचार करतांना बाह्यविश्व आणि अंतर्विश्व यातील एकात्मता जरी एका स्तरावर स्वीकारलेली असली तरी त्याच वेळी त्या दोहोंचा मूळापासून शोध घेण्याची वृत्तीही त्यांनी जपलेली दिसते. अर्थात भौतिकविश्वातील प्राकृतिक किंवा नैसर्गिक तत्त्व आणि सर्वव्यापी मनोमय चैतन्य किंवा पुरुषतत्त्व यांच्यातील एकात्मतेला त्यांनी विशेष महत्त्व दिले.
मूलत आपलं संपूर्ण मानवी जगणं हेच द्वंद्वमूल असल्याची जाणिव प्राचीन काळापासून माणसाला आहे आणि किंबहुना तो एक आदिबंधच आहे यावर प्रख्यात मानसशास्त्रज्ञ कार्ल युंगने आपल्या मंडल सिद्धान्तात अधिक स्पष्ट केले आहे. त्याच्या मते मानवी मनात निर्माण होणाऱया परस्परविरोधी प्रेरणांचा जेव्हा एका केंद्राभोवती तोल साधला जातो, त्यावेळी निर्माण होणारी निर्द्वंद्वावस्था मानवी मनाच्या निकोप अवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची असते. अर्थात अशी निर्द्वंद्वअवस्था फार काळ स्थिर राहात नसते तर नवनवीन द्वंद्वातून पुन्हा नवनवे जीवनसंघर्ष निर्माण होतच राहतात. अशा परिस्थितीत एका व्यापक स्वीकारशील भूमिकेतून या साऱया द्वंद्वात्मकतेकडे पाहिले तरच या परस्परविरोधी घटकांचे संश्लेषण निकोप पद्धतीने होऊ शकते. याप्रकारचा संश्लेषणात्मक विचार पौर्वात्य विचारपरंपरांमध्ये विशेषत्वाने मांडलेला दिसतो.
विविध पौर्वात्य विचारपरंपरांनुसार द्वंद्वात्मक भासणाऱया गोष्टींमध्ये वरवर पाहता जरी परस्परविरोध जाणवत असला तरी त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्या असे एकत्व त्यांच्यात नांदत असते असे मानले जाते. भारतीय परंपरेतील उपनिषदातून व्यक्त झालेला ब्रह्मविचार, बौद्ध दर्शनातील शून्यता विचार, ताओ दर्शनातील वू-वेई म्हणजे निक्रियता विचार, झेन विचारातील सटोरी म्हणजे शब्दातीत अनुभूती, चिनी विचारधारेतील यीन व यँगचे एकत्व अशा विविध विचारपरंपरांमध्ये भरीव आणि पोकळीच्या, जड आणि चेतनाच्या एकत्वाचाच विचार प्रकर्षाने मांडलेला दिसतो. विश्वातील सर्व जड गोष्टींमध्ये जर चैतन्याचाच अंश असेल तर मग या विश्वात जे नाही ते अन्यत्र कोठेही नाही, या विचारधारेतूनच सर्व कलांची निर्मिती झालेली दिसते. सर्व कलांमधून या जड-चेतनाच्या नात्याचाच मनोज्ञ असा वेध घेतलेला दिसतो. अगदी आपल्या भारतीय तंत्रविचारांच्या अनेक पंथांमध्ये पाषाणशिल्पे, धातुशिल्पे मोठय़ा प्रमाणात असून त्यात मानवाकाराच्या चित्रणापासून ते अगदी भौमितिक केवलाकारांपर्यंतचे आविष्कार पाहायला मिळतात.
प्रसिद्ध किशनगड शैलीतील प्रकृती-पुरुषाच्या मिलनाची तांत्रिक चित्रे, मधुराभक्तीचे दर्शन घडवणारी प्रकृतिपुरुषाची चित्रे यादृष्टीने विशेष उल्लेखनीय म्हणावीत अशी आहेत. संस्कृती विकसनाच्या प्रदीर्घ प्रवासात सुरुवातीपासूनच निसर्गातील जडाऐवजी चैतन्याची पूजा करतांना वैश्विक एकात्म चैतन्याचे भानही विकसित होत गेल्यामुळे आदिम प्रकृतीचे चैतन्य पुरुषाशी द्वंद्वात्मक नाते कायमचे जुळलेले दिसते. खरे तर आरंभापासूनच विविध कला, ज्ञानशाखाही आपापल्या परीने या जड- चैतन्याची मनोग्रंथी सोडवण्याचा अटीतटीने प्रयत्न करीत आहेत असे दिसते.
(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव, कवयित्री, चित्रकार आहेत.)