सिनेमा – आय वॉन्ट टू टॉक

>> प्रा. अनिल कवठेकर

‘आय वान्ट टू टाक’ हा चित्रपट अर्जुन सेन नावाच्या माणसाच्या जीवनावर आधारित सत्यकथा आहे. पान्सरचं निदान झाल्यावर डॉक्टरांनी शंभर दिवस जगणार असं त्याला सांगितलं होतं. त्याच्यावर वीस शस्त्रक्रिया होतात तरीही तो माणूस आयुष्य जगतोय या त्याच्या मृत्यूला हुलकावण्या देणाऱया प्रबळ इच्छाशक्तीची ही कथा आहे. आापरेशननंतर बोलता येणार नाही असं सांगितल्यावरही तो बोलणाऱया माणसापेक्षाही जास्त बोलतो. तो कधीच हरला नाही. तो कधीच थकला नाही. तो कधीच रडला नाही. तो जगण्याचा संघर्ष करत राहिला आणि त्याने दाखवून दिलं की विज्ञानाने आणि डॉक्टरांनी सांगितल्यावरही जर तुमचं मन खंबीर असेल तर तुम्ही जगू शकता. जगण्यावर विश्वास ठेवणाऱया प्रत्येकाने एकदा तरी पाहावा असा हा ‘आय वॉन्ट टू टॉक’ जीवनावर भाष्य करणारा वेगळा चित्रपट आहे. जगण्याची उमेद वाढवणारा आहे. आलेल्या संकटांवर मात करण्याची प्रेरणा देणारा आहे.

अर्जुन सेन (अभिषेक बच्चन) हा प्रचंड आत्मविश्वास असणारा. स्वतचं म्हणणं खरं मानणारा आणि खरं करणारा आहे. प्रत्येक वेळी  कंपनीचे पैसे कसे वाचवू शकतो आणि कंपनीचा फायदा कसा करू देऊ शकतो यावर त्याचा अभ्यास आहे. सातत्याने विचार करणारा. पण दुसऱयाच्या मनाचा विचार न करणारा असा हा अर्जुन आहे. तसं पाहिलं तर तो थोडा तुसडा आहे. पण तत्त्वनिष्ठ व हुशार आहे. ज्या अमेरिकन कंपनीत तो कामाला आहे, त्या कंपनीचा विकास कसा होईल याचा सातत्याने विचार करणारा आहे. एक दिवस आाफिसमध्ये प्रेझेंटेशन करताना, त्याला खोकल्याची उबळ येते आणि तिथून तो थेट हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो. त्याच्या खोकल्यातील रक्तामध्ये कॅन्सरच्या पेशी आढळतात. जिवावर बेतलेली ही बातमी ऐकल्यावर तो हॉस्पिटल सोडून निघून जातो. त्यावेळी डॉक्टर त्याला सांगतात की, कदाचित येणारा क्रिसमस तू पाहू शकणार नाहीस. त्याच्याकडे फक्त शंभर दिवस उरले आहेत.

डॉक्टरांशी वाद घालून तो बाहेर पडतो; कारण वाद घालण्यात तो अत्यंत हुशार असतो. दुसऱया दिवशी तो कोणाचेही फोन घेत नाही आणि त्याला जाणवतं की जीवनाने त्याच्याशी विश्वासघात केलेला आहे. अर्जुन हताश होतो. मित्राच्या गळय़ात पडून रडतो. मित्र त्याला सेकंड ओपिनियन घेण्यासाठी सांगतो आणि ते दुसऱया हॉस्पिटलमध्ये जातात. तो त्याच्या बॅगेतून कंठातल्या स्वरयंत्राचं  चित्र बाहेर काढतो आणि मला या चित्रावरून नेमकी माहिती द्या म्हणजे माझी भीती कमी होईल असं डाक्टरांना सांगतो. डॉक्टर त्या चित्राच्या आधारे समजावून सांगतात. डॉक्टरांची असिस्टंट सांगते की, आापरेशनंतर बोलता येणं खूप अवघड आहे.

त्याच सुमारास अर्जुन आणि त्याच्या बायकोमध्ये घटस्फोटाची केस चालू असते. नवराबायको वेगळे होतात. त्या दोघांचे दुःखही वेगळं असतं. आपला नवरा एका दुर्धर आजाराच्या गर्तेत अडकलाय याची तिला आणि तिच्या वकिलाला काहीच वाटत नसतं. प्रत्येक ऑपरेशननंतर खचत गेलेला रूग्ण अभिषेकने छान रंगवला आहे. खऱया अर्थाने अमिताभ बच्चनच्या मुलाने करावा असा अभिनय त्याने केला आहे. कॅन्सर डिटेक्ट झाल्यापासून त्याचं बोलणं थांबलं आहे. खूप बोलणारा आणि आाफिसमध्ये प्रत्येक गोष्ट सांगणारा, समजावणारा आता फक्त दोन किंवा तीन शब्दांतच बोलणं आटपत असतो. जीवन खरोखरच समजून घेणं खूप अवघड आहे. कोणत्या क्षणी काही होऊ शकतं, हे या चित्रपटात सातत्याने जाणवत राहतं. आहे त्या स्थितीत जगणं किती महत्त्वाचं आहे आणि मृत्यूशी लढणं किती महत्त्वाचं आहे, हे हा चित्रपट आपल्याला अप्रत्यक्षपणे सांगत जातो. असिस्टंट डॉक्टर त्याला विचारते की, तुला जीवन परत मिळाल्यानंतर तू काय करणार? तेव्हा तो म्हणतो, मी खूप बोलणार आहे. त्याचा आनंद बोलण्यातच आहे. प्रत्येक कामाचा बॅकअप, त्या बॅकअपचा बॅकअप त्या बॅकअपचा बॅकअप ठेवणाऱया अर्जुनकडे त्याच्या आजाराचा कोणताच बॅकअप नाही. शंभर दिवसांनंतर मरणाचा दिवस ठरलेला आहे. मरणाआधीच मरण स्वीकारायचं म्हणून तो एक जागा निश्चित करतो. कार कुठून खाली पडली तर तो अपघात वाटेल असा मरणाच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू आहे. शेवटच्या दिवशी मरणापूर्वी नव्वद मिनिटांचा बॉडी मसाज तो करून घेतो. ज्यांनी ज्यांनी त्याला मदत केलीय त्या सगळय़ांना गिफ्ट आणि धन्यवाद पत्र पाठवतो. असिस्टंट डा. नॅन्सीला त्याचं गिफ्ट मिळताच तिला अर्जुन काहीतरी भयंकर करणार असल्याची जाणीव होते. ती अर्जुनला फोन करून परत बोलवते आणि मृत्यूशी लढायला घाबरू नकोस असं अधिकारवाणीने सांगते. ज्या ठिकाणी तो आत्महत्त्या करणार असतो तो रस्ता बंद असतो. तेथील पोलीस अधिकारी त्याला दुसऱया मार्गाने जायला सांगतात. मृत्यूला कवटाळायला निघालेल्या माणसाला जेव्हा कोणी दुसरा मार्ग शोधायला सांगतो तेव्हा त्याला जगण्याचाच मार्ग निवडावा लागतो.

या चित्रपटाचा विषय आहे मरण म्हणजे काय? मरण म्हणजे खूप दूर निघून जाणं. मुलगी विचारते तू मरणार आहेस का? तो म्हणतो नाही मी मरणार नाही. हे दृश्य चित्रपटातलं अत्यंत महत्त्वाचं दृश्य झालं असतं. जर इथे आपल्या लहान मुलीला तिच्या भाषेत समजेल अशा संवादातून मृत्यू म्हणजे काय हे अर्जुनला सांगण्याची संधी दिग्दर्शकाने आणि संवाद लेखकाने दिली असती तर… ज्या मरण या विषयावर हा चित्रपट उभा आहे त्याच्यावर फोकस करण्याची संधी दिग्दर्शकाने आणि संवाद लेखकाने घालवलेली आहे.

मुलीने विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्याला देता येत नाही. तिने काढलेल्या आठ सर्कलमध्ये तो आठव्या सर्कलवर आहे आणि आतल्या सर्कलमध्ये ती आणि तिची आई आहे. त्याचं आणि तिचं नातं इतकं दूरचं झाल्याचं त्याला जाणवतं. आपल्या व्यवसायाच्या आणि त्यानंतर आलेल्या आजारपणाच्या प्रभावामुळे आपण आपल्या मुलीला समजून घेऊ शकलो नाही याची त्याला खंत वाटू लागते.

कॅन्सरच्या आजारपणातून सावरत असतानाच त्याला हार्ट अटॅक येतो. या सगळय़ात तो रडत, कुढत नाही. प्रत्येक ऑपरेशनला तोंड देत तो मृत्यूच्या जवळ चाललेला असताना त्याच्या चेहऱयावर भीतीचे भाव नसतात. या संपूर्ण प्रवासात मुलगी रेयाच्या मनात चाललेला गोंधळ, वडिलांच्या आजारपणात तिला कुठेही व्यक्त करता आलेला नाही; कारण सगळा चित्रपट अर्जुनच्या आजारपणाभोवती फिरत राहतो. नदीचा विस्तीर्ण किनारा. किनाऱयाच्या, विचारांच्या एका उंचीवर बसलेले दोघेजण,  बाप आणि मुलगी. दोघांच्या घटस्फोटामुळे मुलीला अकाली आलेले प्रौढत्व आणि त्या प्रौढत्वामध्ये लपलेलं तिचं बालपण. रेयाच्या मनातील हा वैचारिक, भावनिक संघर्ष दिग्दर्शकाने छान मांडला आहे. चित्रपट संपायला येतो तेव्हा तिचं विश्व सुरू होतं. इथे पटकथेत काही दोष आहेत असं वाटायला लागतं.

मुलीसोबतचे शेवटचे संवाद या चित्रपटाचा सार आहे. या सगळय़ा वेदनांमध्ये, आजारपणामध्ये तो एक गोष्ट शिकलाय आणि ती म्हणजे त्या वेदना त्याला तो जिवंत असल्याची शाश्वती देतात. आजारपणातून उठल्यानंतर त्याला मॅरेथॉन धावायची आहे. मुलगी म्हणते उद्या तुम्ही खरंच धावणार आहात का? तेव्हा तो म्हणतो की, त्या
मॅरेथॉन धावणाऱया लोकांसोबत स्टार्टिंग पॉइंटला मी उभा असणार हाच माझा विजय आहे. तेच माझं मॅरेथॉन आहे.

आतापर्यंत आलेल्या अभिषेकच्या अनेक चित्रपटांतील अभिनयापेक्षा या चित्रपटातील त्याचा अभिनय खरोखरच खूपच नैसर्गिक आहे. प्रभावी आहे आणि आपल्याला संदेश देणारा आहे. रेयाच्या भूमिकेत असलेल्या अहिल्या बामरूचा अभिनय उत्तम आहे. शुजित सरकार यांनी दिग्दर्शनाच्या काही जागा उत्तम साधलेल्या आहेत. प्रेरणात्मक, नवा दृष्टिकोन देणारा असा हा क्लासिक चित्रपट आहे.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)