कथा एका चवीची- प्रेमाचा गुलकंद

>> रश्मी वारंग

‘ऊन जरा जास्त आहे’ हे वाक्य आपल्या सगळ्यांच्या ओठी सध्या रुळलंय. ऊन जसं वाढत जातं तसं त्या उन्हाळ्यावर मात करण्याचे गारेगार उपायही शोधले जातात. असाच एक पारंपरिक चविष्ट उपाय म्हणजे गुलकंद. याच गुलकंदाची ही गुलाबी गोष्ट. 

गुलाबाच्या पाकळ्या आणि शर्करा पाक यापासून गुलकंद बनतो.  या शब्दाचं मूळ पर्शियन आहे. पर्शियन भाषेत ‘गुल’ म्हणजे गुलाब आणि ‘कंद’ म्हणजे ‘खंड‘ या शब्दाचाच अपभ्रंश. खंड अर्थात शर्करा खंड म्हणजेच आपली साखर. ताज्या गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुऊन वाळवल्या जातात. या पाकळ्या आणि साखर एकत्र शिजवली जाते. चवीनुसार त्यात थोडीशी बडीशेप किंवा वेलची घातली जाते. थोडासा मध मिसळला जातो. मंद आचेवर हे मिश्रण जसं शिजत जातं… गुलाबाचा स्वाद, अर्क साखरेमध्ये मिसळत जातो आणि त्यातून तयार होतो गुलकंद. पारंपरिक गुलकंदामध्ये दमसाक नावाचे गुलाब वापरले जातात. गुलाबीसर रंगाच्या या गुलाबाशिवाय चिनी गुलाब, फ्रेंच गुलाब किंवा डच गुलाब यांचाही वापर गुलकंदाकरिता होऊ शकतो. मात्र दमसाक गुलाबाचा खासम खास स्वाद त्या गुलकंदाला वेगळेपणा प्राप्त करून देतो. जसा कश्मिरी केशर हा जगात त्याच्या अस्सल स्वादासाठी नावाजला जातो तसाच दमसाक गुलाबापासून बनवलेला गुलकंदही वेगळा ठरतो.

इसवी सन पूर्व 900 पासून गुलकंदाचा विविध साहित्यात उल्लेख झालेला आढळतो. आयुर्वेदिक, ग्रीक, पर्शियन आणि अरेबिक युनानी या सगळ्या औषध पद्धतींमध्ये गुलकंदाचा वापर फार पूर्वीपासून होत आलेला आहे. एखाद्या औषधात अतिशय गरम पडणारा पदार्थ वा घटक असेल तर त्याची गर्मी कमी करण्यासाठी अर्थात आताच्या भाषेत ‘कूलिंग इफेक्ट’ देण्यासाठी गुलकंद खायचा सल्ला दिला जाई. आयुर्वेदात गुलकंदाचा उल्लेख ‘रसायन’ असा होतो. सध्याच्या काळातील
टॉनिक्स जे काम करतात तेच काम गुलकंदाच्या मार्फत केलं जाई. उष्माघात, पित्त, अपचन, अस्वस्थपणा, डोळ्यांची जळजळ, खूप जास्त घाम येणं अशा विविध समस्यांसाठी गुलकंद खाण्याचा सल्ला दिला जाई.

या नेहमीच्या शारीरिक समस्यांखेरीज शृंगारिक साधन म्हणूनही गुलकंदाचा वापर होत असे. दमसाक गुलाब  प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. त्यांचा नैसर्गिक स्वाद गुलकंदाच्या मार्फत शरीरात पोहोचल्यावर शरीराची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. शिवाय गुलकंद रक्तप्रवाह नियमित करण्यासही मदत करत असल्याने एखाद्या स्त्राrला त्वचेच्या संदर्भात समस्या असतील तर गुलकंद खायला सांगितला जायचा. ज्यामुळे चेहऱयावरील पुळ्या किंवा पुटिका यांचे प्रमाण कमी व्हायला मदत होई. गुलकंदाचे हे फायदे पाहता रोमँटिक नातेसंबंधांच्या दरम्यान गुलकंद खाणं स्त्राr आणि पुरुष या दोघांसाठीही महत्त्वाचं ठरत असे.

उत्तर भारतात गुलकंद बहुतेक वेळा खायच्या पानामध्ये मिसळला जातो आणि विविध मिठाई आणि मिष्टान्नांमध्ये त्याचा समावेश होतो. गुलकंदाचं महत्त्वाचं कार्य काय? तर स्थानिक पदार्थांना थोडासा राजेशाही स्पर्श प्राप्त करून देणं. दक्षिण भारतातील रस्त्यांवर साल नामक पानाच्या द्रोणात केळं, लोणी घालून  त्यात  गुलकंद मिसळून खाल्ला जातो. काही ठिकाणी हा उन्हाळ्यातील प्रसिद्ध थंडगार नाश्ता आहे. गुलकंदाचा स्वाद असणारं आईक्रीम, कुल्फी, फालुदा आवडीने खाल्ले जातातच, पण अनेक घरांत उन्हाळा सुरू झाल्यानंतर रोज एक चमचा गुलकंद औषध म्हणूनही खायला दिला जातो.

असा हा बहुपयोगी शरीराला थंडावा देणारा गुलकंद आचार्य अत्रे यांनी ‘केशवकुमार’ या नावाने लेखन करताना कवितेत अजरामर केला आहे. चाळीतल्या एका मुलाचं एका मुलीवर प्रेम असतं आणि तो तिला न विसरता एक गुलाब रोज भेट देत असतो. अनेक दिवस जातात, पण त्या मुलीकडून प्रेमाला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने जेव्हा हा उतावीळ तरुण त्या मुलीला विचारणा करतो तेव्हा ती चक्क त्याला गुलकंदाची बरणी आणून देते आणि तो सुद्धा…

प्रेमापायी भरला

‘भुर्दंड न थोडा

प्रेमलाभ नच, गुलकंद तरी

कशास हा दवडा?’

असं म्हणत गुलकंद घरी घेऊन येतो. अशा निराश प्रेमवीरांना कवी जाता जाता सल्ला देतात,

‘तोंड आंबले असेल

ज्यांचे प्रेम निराशेने

प्रेमाचा गुलकंद तयांनी

चाखुनी हा बघणे’

तुमचा प्रेमभंग झाला असो अथवा नसो, पण उन्हाळा सुसह्य करण्यासाठी गुलकंद  एक खरंच गुलाबी पर्याय आहे. चाखून बघा आणि गुलाब पाकळ्यांचा सुगंधी गारवा तनमनात जरूर अनुभवा.

(लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)