स्वराज्यमाता जिजाऊ

>> योगेश अशोक साटम

मराठी माती ही वीरांची भूमी आहे. तसेच वीरमातांचीदेखील एक तेजस्वी परंपरा आहे. देशाला कीर्ती आणि वैभव प्राप्त करून देणाऱया अशा वीरमातांची चरित्रे मात्र लोकांना तितकीशी माहीत नाहीत. बालपणी सुसंस्कार करून महापुरुषांचे व्यक्तिमत्त्व घडविणाऱया आणि आपल्या महान त्यागानं त्यांच्यातील शौर्याची ज्योत प्रज्वलित करून देशाचा इतिहास घडविणाऱया मातांचे इतिहासातील स्थान अत्यंत गौरवास्पद आहे. युगपुरुष शिवरायांचे जीवन घडविणाऱया लोकमाता, राजमाता, स्वराज्यमाता जिजाऊ साहेबांचे चरित्र अत्यंत पवित्र व रोमांचकारी आहे.

जिजाऊ माँसाहेबांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी म्हणजेच पौष शुद्ध पौर्णिमेला, पुष्य नक्षत्रावर झाला. या वर्षी 28 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ साहेबांची तिथीनुसार 423 वी जयंती आहे. त्याअनुषंगाने मला आठवण होतेय ती महाराष्ट्र कामगार कल्याण भवन, अंधेरी येथील ॐ साई निर्मित या नाटय़संस्थेची. ही नाटय़संस्था गेली 40 वर्षे कामगार कल्याण केंद्रात कार्यरत आहे. हे करत असताना या नाटय़संस्थेचे संचालक सत्यवान धुरी यांनी एक संकल्पना मांडली की, ‘राजमाता’ या ऐतिहासिक नाटकाचे प्रयोग करण्यासाठी बराच खर्च येतो. म्हणून जिजामातांचा इतिहास आपण अभिवाचन करून लोकांपर्यंत पोहोचवावा. ठरल्याप्रमाणे त्यांनी व त्यांच्या सहकाऱयांनी ‘राजमाता जिजाऊ अभिवाचन’च्या कार्यक्रमाचे एकूण 78 कार्यक्रम सादर केले. पण हे सांगत असताना त्यांनी एक खंत व्यक्त केली ती म्हणजे सन 2000 ते 2020 या एकवीस वर्षात केवळ 78 कार्यक्रम झाले. शिवाय त्यांनी या गोष्टीचीही विशेष नोंद केली की, हे 78 कार्यक्रम त्यांना सामान्य नागरिकांनीच दिले आहेत तेही बारसा, वाढदिवस, पूजा अशा शुभप्रसंगी.

खरं तर छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत असे प्रत्येकाला वाटते, परंतु राजमाता जिजाऊ असतील तरच हे शक्य आहे, असे सत्यवान धुरी यांनी नमूद केले. राजमाता जिजाऊ यांच्या थोर कर्तृत्वाची गाथा सर्वदूर प्रसारीत व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या