साय-फाय- डायर वुल्फचा पुनर्जन्म

>> प्रसाद ताम्हनकर

जगभरात प्रचंड गाजलेल्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेत ग्राफिक्सच्या माध्यमातून जगाला डायर वुल्फ या लांडग्याच्या प्रजातीचे दर्शन प्रेक्षकांना घडले. लांडग्याची ही प्रजाती हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झाली होती. जेनेटिक इंजिनीअरिंग क्षेत्रात काम करणाऱया कोलोसल बायोसायन्सेस या अमेरिकन कंपनीने नामशेष झालेल्या या प्रजातीच्या डीएनएच्या मदतीने या लांडग्याला पुन्हा जन्माला घालण्यात यश मिळवले आहे. प्रथम जन्माला आलेल्या दोन लांडग्याच्या पिल्लांना रोमेलास आणि रेमस अशी नावे देण्यात आली आहेत. रोमची स्थापना करणाऱया दोन जुळ्या पौराणिक पात्रांच्या नावावरून ही नावे ठेवण्यात आली आहेत. या दोन जुळ्यांची रक्षा एका मादी लांडग्याने केल्याची दंतकथादेखील प्रसिद्ध आहे.

कोलोसल बायोसायन्सेसमध्ये प्रमुख विज्ञान सल्लागार म्हणून काम करणाऱया डॉ. शापिरो यांचा आनंद तर काही वेगळा आहे. 2015 साली त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात नामशेष झालेल्या कुठल्याही प्राण्याला क्लोनिंगच्या माध्यमातून पुन्हा जिवंत करणे शक्य नसल्याचे मत त्यांनी मांडले होते. मात्र आता त्यांच्याच कंपनीने ही कामगिरी यशस्वी करून दाखवली आहे. पुरातत्त्व शाखेच्या संशोधकांच्या मतानुसार, डायर वुल्फ या लांडग्याच्या जातीचे सर्वात जुने जिवाश्म हे अडीच लाख वर्षांपूर्वीचे आहेत. डायर वुल्फ हे अमेरिकेच्या उत्तर भागात आढळत असत आणि 12 हजार वर्षांपूर्वी शेवटच्या हिमयुगात ही प्रजाती नामशेष झाली.

डायर वुल्फच्या पुनर्निर्मितीसाठी सर्वात महत्त्वाचे ठरले ते म्हणजे जीनोम. जीनोम म्हणजे एखाद्या जिवाच्या संपूर्ण डीएनएचा संच. कोलोसल बायोसायन्सेसला डायर वुल्फची 72 हजार वर्षे जुनी कवटी आणि 13 हजार वर्षे जुना दात सापडला आणि त्यापासून मिळालेल्या डीएनएने या प्राण्याचा जीनोम तयार करण्यात यश मिळाले. हा जीनोम तयार झाल्यानंतर अवघ्या 18 महिन्यांत दोन पिल्लांचा जन्म झाला. या जीनोमची तुलना डायर वुल्फशी मिळत्या जुळत्या असलेल्या ग्रे वुल्फ या लांडग्याच्या जीनोमशी करण्यात आली आणि त्यात आवश्यकतेनुसार काही बदल करण्यात आले. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात डायर वुल्फचे डीएनए ग्रे वुल्फच्या पेशीमध्ये (सेल) घालून भ्रूण तयार करण्यात आले. त्यानंतर हे भ्रूण कुत्र्याच्या गर्भाशयात घालून विकसित करण्यात आले. नंतर सी सेक्शन सर्जरीद्वारे या पिल्लांना जन्म देण्यात आला.

डायर वुल्फचे भ्रूण तयार झाल्यानंतर त्याला विकसित करण्यासाठी ग्रे वुल्फचा वापर सरोगेट मदर म्हणून का करण्यात आला नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र ग्रे वुल्फ ही प्रजाती डायर वुल्फशी मिळती जुळती असली तरी कोलोसल बायोसायन्सेस या कंपनीला कुत्र्यांचा वापर सरोगेट म्हणून करण्याचा जास्त अनुभव असल्याने त्यांनी निवड करण्यात आली. जन्माला आलेली ही पिल्ले म्हणजे खरे डायर वुल्फ आहेत का? असा प्रश्नदेखील या वेळी अनेक संशोधकांनी उपस्थित केला. मात्र कोलोसल बायोसायन्सेसच्या मते जन्माला आलेले लांडगे हे खरे डायर वुल्फ आहेत असे नाही, तर ते डायर वुल्फ प्रजातीशी मिळते जुळते असे प्रॉक्सी डायर वुल्फ किंवा कोलासस डायर वुल्फ म्हणता येतील. त्यांच्यात ग्रे वुल्फचे गुणदेखील मिसळण्यात आले आहेत. हा प्रयोग कितपत नैतिक आहे, यावरदेखील सध्या चर्चा रंगली असून भविष्यात नामवंत संशोधकांचे यावर काय मत होते, हे बघणे रंजक असणार आहे.

या पिल्लांना जन्माला घालण्यामागे नक्की उद्देश काय आहे, यावरदेखील कंपनीने आपले मत दिले आहे. या पिल्लांचा वापर करून इतर पिल्ले जन्माला घालण्याचा कोणताही विचार नाही. या पिल्लांना जंगलातदेखील सोडले जाणार नाही, तर त्यांना एका संरक्षित ठिकाणी ठेवून त्यांचा अभ्यास केला जाणार आहे. हे प्राणी सभोवतालच्या वातावरणात कसे जगतात, स्वतला कसे निरोगी ठेवतात, याचा अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यासातून जगात सध्या नामशेष होत चाललेल्या प्रजातींचे संवर्धन करणे शक्य आहे का? हे तपासले जाणार आहे. एका अभ्यासानुसार 3.7 अब्ज वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या 99 टक्के प्रजाती या नामशेष झालेल्या आहेत, तर अस्तित्वात असलेल्या प्रजातींपैकी 48 टक्के प्रजातींमधील प्राण्यांची संख्या कमी होत चालली आहे.

 [email protected]