।। सीतास्वरुपा ।।- सीता शक्ती श्रीरामाची

>> वृषाली साठे

सीतामाईंच्या वनवासातील आयुष्यातील हा पट. या काळातही त्या तितक्याच विचारपूर्वक निर्णय घेत परिस्थिती हाताळत. सीतामाई श्रीरामाच्या शक्ती आहेत हे कायम सिद्ध झाले आहे. मागच्या भागात आपण शूर्पणखा ही मायावी रूप धारण करून आश्रमातील योगींना भुलवत होती ते पाहिलं. आता पुढे…

सीतामाई स्वयंपाक करत होत्या. त्यांना एक तीव्र सुगंध आला. त्यांनी पाहिलं की, एक सुंदर स्त्राr हातात एक भांडं घेऊन आश्रमात आली आहे. श्रीराम आणि लक्ष्मणजी तिच्याशी बोलत आहेत व तिने आणलेलं भांडं लक्ष्मण यांनी हातात घेतलं आहे. सीतामाई त्वरित बाहेर येतात आणि ते भांडं लक्ष्मण यांच्याकडून घेतात. सीतामाईंना बघताच ती सुंदर स्त्राr वैतागून श्रीरामाकडे बघत म्हणते, “मला माहीत नव्हतं की, तुमची दासी तुमच्याबरोबर राहते.’’ श्रीराम तिला सीतामाई पत्नी असल्याचे सांगतात.

शिवाय हेही सांगतात की, “माझ्या पत्नीची हरकत नसेल तर तुम्ही आमच्याबरोबर जेवायला बसा.’’ सीतामाईचे संस्कारच होते की, त्या कधीही अतिथीला खाल्ल्याशिवाय पाठवत नसत. सीतामाई आश्रमाच्या मागच्या बाजूला काळोख्या जागी जातात. त्या स्त्राrने आणलेलं अन्न तिथे टाकून भांडं स्वच्छ धुऊन त्यात स्वत शिजवलेलं अन्न भरतात  आणि मग त्या तिघांना जेवायला वाढतात. जेवून झाल्यावर श्रीरामजी आणि लक्ष्मणजीमध्ये काहीच फरक पडला नसल्याचं पाहून ती स्त्राr सीतामाईला ओरडून बोलली, “मी आणलेलं अन्न तू का वाढलं नाहीस?’’ सीतामाई म्हणतात की, “मी तुला ओळखलं आहे. तू आमच्यावर तुझी मायावी शक्ती वापरू शकत नाही.’’ हे ऐकताच ती स्त्राr मूळ रूपात येते. ती रावणाची बहीण शूर्पणखा असते. ती सीतामाईच्या अंगावर धावून जाते.  श्रीरामजी काही करणार इतक्यात लक्ष्मणजी शूर्पणखेच्या दिशेने चाकू फेकतात. त्याने तिचं नाक कापल जातं. ती रागावून निघून जाते. जाताना लक्ष्मणाला म्हणते, “याची फळं तुला भोगावीच लागतील. तुला खूप यातनादायी मृत्यू येईल.’’ सीतामाईंना खूप वाईट वाटतं. कारण त्यांना माहीत असतं की कर्माचं फळ मिळतंच आणि लक्ष्मणाने हे कर्म केवळ आपल्या सुरक्षिततेसाठी केलं होतं. मग या कर्माचं फळ एकटय़ा लक्ष्मणाने का भोगावं?

सीतामाई श्रीरामजी आणि लक्ष्मणाला म्हणतात की, “रावणाच्या बहिणीची झालेली अशी दुर्दशा रावण सहन करणार नाही. तो आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो. आपल्याला अजून सतर्क राहायला हवं.’’ दुसऱया दिवशी सीतामाईंना दिसलं की त्यांनी फेकून दिलेलं अन्न खाऊन तीन पक्षी मरून पडलेले आहेत. श्रीरामजी सीतामाईंना समजावतात की, आपण धैर्याने घ्यायला हवं. पुढे रावणाशी होणाऱया युद्धात किती जीव जाणार आहेत याची कल्पना न केलेली बरी.

लक्ष्मणजी आवेशाने म्हणतात की, “आपण रावणावर हल्ला करू.’’ श्रीरामजी त्याला सांगतात की, “काही ठोस कारण असल्याशिवाय आपण त्याच्याशी युद्ध करू शकत नाही.’’ लक्ष्मणजी म्हणतात की, “रावणाच्या बहिणीने आपल्याला विष देऊन मारायचा प्रयत्न केला हे कारण आहेच की.’’

श्रीरामजी म्हणतात की, “यात रावणाचा प्रत्यक्ष हात होता हे आपण सिद्ध करू शकत नाही. शिवाय रावण महादेवाचा भक्त आहे हे आपण विसरता कामा नये. सध्या तरी आपण शांत राहून पुढे काय होते त्याची वाट बघू या.’’

सीतामाई म्हणतात की, “मी रावणाला एकदा पाहिलं होतं. तेव्हा त्याला बाबांकडे असलेलं महादेवाचं धनुष्य हवं होतं. बाबांनी त्याला नकार दिला. तेव्हा तो बऱयाच धमक्या देऊन गेला होता, पण त्या वेळेस बाबांनी मला त्यांच्या शेजारी  बसवलं होतं. का ते माहीत नाही.’’ श्रीरामजी म्हणाले, “सीते, तू जनकबाबांची शक्ती होतीस. तसंच तू माझीदेखील शक्ती आहेस (रामरक्षा या स्तोत्रातदेखील सीता शक्तीही सीतामाई असल्याचं बुधकौशिक ऋषी सांगतात).

त्या वेळचा रावण आणि आताचा रावण यात खूप फरक आहे. जपतपाने आणि तपश्चर्येने त्याला खूप वरदान मिळाली आहेत, पण त्याचा तो दुरुपयोग करतो आहे. शिवाय आता त्याच्याकडे बऱयाच मायावी शक्ती आहेत. जगातील सगळ्या वाईट शक्तींना त्याने एकत्र केलं आहे. त्याच्याशी केलेलं युद्ध हे केवळ एका व्यक्तीशी नसून सर्व वाईट शक्तींशी असेल.’’ सीतामाई एकदम गप्प होतात. त्यांच्या डोळ्यांसमोर अचानक एक दृश्य दिसू लागतं. त्या दृश्यात नारायण होते आणि त्या स्वत नारायणी होत्या. त्यांचा एक भक्त त्यांच्यापासून दूर दूर एका शून्य विवरात जात आहे आणि त्या त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. श्रीरामजी यांनाही हेच दृश्य दिसतं, पण दोघंही काहीच बोलत नाहीत. सीतामाईंना निसर्गातला फरक जाणवत असतो. वेळी-अवेळी पाऊस येणं, नेहमीच्या लयीत वारा न वाहणं, पशुपक्ष्यांच्या वागण्यातला बदल आणि नद्यांची बदलणारी गती… वातावरण गंभीर जाणवत होतं. संकटाची  चाहूल सीतामाईंना लागली होती. त्या पुत्री गोदावरीला भेटायला गेल्या. गोदावरी म्हणाली, “माते, आता ती वेळ आली आहे. रावणाचा सामना करावाच लागेल आणि हा सामना तुम्हाला एकटीला करावा लागेल. कारण तुम्हीच रावणाच्या हृदयात जाऊन त्याच्या मनात अद्वितीय प्रेम जागवू शकता. सध्या त्याच्या मनात फक्त घृणा आहे. पण हे सगळं तुमच्या सहमतीशिवाय होऊ शकत नाही.’’ सीतामाई तिला सहमती देत म्हणतात, “मी रावणाचा सामना करेन आणि माझ्या आध्यात्मिक साधनांचा उपयोग करून त्याला समजावेन.’’ गोदावरी म्हणते, “माते, तुम्हाला असूर साम्राज्यात एकटीने जाऊन हे कार्य करायचं आहे. त्यासाठी सर्व आध्यात्मिक शक्तींचा वापर करावा लागेल. मगच या वसुंधरेचं दुःख दूर होईल. या दरम्यान श्रीरामांचा वियोग सहन करावा लागेल. यासाठी तुमची सहमती आवश्यक आहे. कारण तुमच्या सहमतीशिवाय पुढचा घटनाक्रम घडणं शक्यच नाही.’’

सीतामाई जड अंतकरणाने सहमती देते. श्रीरामजी सीतामाईंना शोधत येतात. सीतामाईंच्या डोळ्यांतलं पाणी बघून विचारतात, “सीते, तू अशी विचलित का झाली आहेस?’’ तेव्हा सीतामाई म्हणतात, “स्वामी जर कधी मी तुमच्याबरोबर नसल्याचा प्रसंग ओढवला तर त्या विचाराने अजिबात घाबरू नका. मी माझी सुरक्षा नक्कीच करू शकते.’’

श्रीरामजी म्हणतात, “सीते, मला माहीत आहे की, तुझ्यात आध्यात्मिक शक्ती खूप आहे आणि त्यायोगे तू तुझं रक्षण करू शकतेस, पण मी पण शपथ घेतो की, तू पृथ्वीवर कुठेही असलीस तरी मी तुला हुडकून काढीन. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे.’’ सीतामाई म्हणतात, “स्वामी तुम्ही आणि मी वेगळे नाहीच आहोत. जेव्हा मी तुमच्या डोळ्यांत बघते तेव्हा मी दुःखमुक्त होते आणि मला शांती मिळते. खऱया अर्थाने मी मला गवसते.’’

मग दोघे कुटीत परत येतात. त्या दिवसापासून सीतामाई थोडय़ा विचारमग्न राहायला लागल्या. श्रीरामजी सीतामाईंना खूश कसं करावं याचा विचारात असताना त्यांना एक सोनेरी हरीण दिसतं.

[email protected]