
>> दिव्या सौदागर
दुसऱयाशी किंवा स्वतशी केलेली तुलना, सततचे सल्ले, दुसऱयांना सांगून त्यांच्याकरवी दिले जाणारे उपदेशाचे डोस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठरविल्यापेक्षा बेत बदलण्यावर केला गेलेला आक्षेप किंवा त्याबद्दलची साशंकता विद्यार्थीदशेत असलेल्या मुलांना तणाव देणारी ठरते.
घडय़ाळात सहाचा गजर झाला आणि काव्या अनुपला शांत झोपलेला बघून पुन्हा एकदा कमालीची वैतागली. ‘‘अरे घोडय़ा, आता ऊठ. साडेसहाला शाळेची व्हॅन येईल. अजून तुझं आवरायचं आहे. तुला सगळ्यासाठी एकतर वेळ लागतो. उठतोस की बाबांना हाक मारू?’’ बाबांचं नाव जसं कानावर पडलं, तसा अनुप डोळे चोळत उठून बसला, पण डोळ्यांत पेंग होतीच. त्याच वेळी त्याच्या पाठीवर सणसणीत हातांचा रट्टा बसला आणि त्याची झोप खाडकन उडाली. बाबा त्याच वेळी त्याच्या रूममध्ये शिरले होते आणि त्यांनीच तो उठत नाही म्हणून त्याला लगावून दिली होती. ‘‘अहो काय करताय हे? सकाळी सकाळी त्याच्या शाळेत जायच्या वेळी आणि ही काही 15 वर्षांच्या मुलाला वागवायची पद्धत आहे का?’’ अनुपचं अपमानित झालेलं तोंड पाहताना काव्यालाच वाईट वाटत होतं.
अनुप बाबांकडे न पाहता पाठ चोळत चोळत उठला. काव्याकडेही त्याने बघायचं टाळलं आणि दहा मिनिटांत स्वतचं आवरून, युनिफॉर्म घालून त्याने शूज पायात चढवले. ‘‘पटकन खाऊन घे’’ काव्या त्याचा डबा दप्तरात ठेवत म्हणाली. ‘‘नको, मला भूक नाही’’ असं म्हणत शांतपणे त्याने दप्तर पाठीला लावलं आणि कोणाकडेही न पाहता अनुप शाळेच्या व्हॅनसाठी धडाधड जिने उतरून निघूनही गेला.
हे रोजचंच सुरू होतं. अनुपला सगळ्याच बाबतीत धक्का मारावा लागायचा. एक प्रकारचं शैथिल्य त्याला होतं. एका जागी एकदा बसला की, तो तासन्तास हलायचा नाही. अभ्यासासाठी त्याला हलवावे लागे. त्यामुळे घरात त्यावरून काव्या आणि तिच्या नवऱयाची चिडचिड सुरू झाली होती. ‘‘दहावीचं महत्त्वाचं वर्ष आहे तरीही हा कुंभकर्णासारखा झोपलेला तरी असतो किंवा मोबाईलवर काहीतरी बघत बसलेला तरी असतो. मग यांची चिडचिड होते. ते ओरडतात तेव्हा हा एवढं तोंड करून बसतो. हल्ली तर ते अनुपवर हात पण उचलायला लागले आहेत.’’ अनुपला घेऊन आलेली काव्या सांगत होती.
काव्याच्या मते अनुप हा खरे तर हुशार आणि मेहनती मुलगा होता, पण गेलं वर्षभर त्याचा आळशीपणा वाढला होता. काव्या बोलत असताना एक लक्षात येत होतं की, अनुप शांत बसून होता. स्वतविषयी एवढय़ा तक्रारी ऐकूनही त्याच्या चेहऱयाची रेष हलली नव्हती. “अनुप, आई बोलली ते खरं आहे का?’’ असं विचारताच त्याच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं आणि “मला दहावीच्या परीक्षेचं टेन्शन आलेलं आहे.’’ त्याने मुसमुसत समस्या सांगितली. ‘‘अभ्यास नाही होत म्हणून आलं आहे का? की मार्कांचं?’’ त्याला पुन्हा विचारण्यात आलं. “मार्कांचं’’ असं त्याने उत्तर दिलं. “मग आई सांगत होती की, तू अभ्यास करतच नाहीस.’’
“हो, कारण मला अभ्यास करावासा वाटत नाही. कारण मी जे काही ठरवतो ते माझे आई-बाबा कायम सगळ्यांना डिक्लेअर करत असतात. माझं सगळं लाईफ त्यांनी सगळ्यांना ओपन केलं आहे. मला माझी स्वतची स्पेस नाही. मी जे काही ठरवतो आणि आई-बाबांना सांगतो ते दुसऱया दिवशी माझ्या मामा, मावशी, आत्या आणि काका अशा सगळ्यांना माहीत पडतं.’’ अनुप आता स्वतबद्दल व्यवस्थित सांगत होता आणि त्याच्या समस्यांबद्दल खुलेपणाने बोलत होता. “मी नववी संपल्यावर माझं एक करीअर ठरवलं होतं. मला स्केचेस करायला आवडतं म्हणून मी ‘आर्ट’ लाइन ठरवली होती. करीअर आणि गोल्स याबद्दल आमच्या शाळेत एक टॉक होतं. त्यात त्यांनी आपलं करीअर आणि गोल सेटिंगबद्दल आम्हाला घरी लिहून काढायला सांगितलं होतं. ते पेज एका वहीच्या मागे ठेवायला सांगितलं होतं. मला ही कॉन्सेप्ट आवडली आणि त्याप्रमाणे मी केलं. ते पेज माझ्या डेस्कवर ठेऊन दिलं, पण हे आई-बाबांना माहिती पडलं. झालं. त्यांनी लगेच सगळ्यांना डिक्लेअर केलं. आमचे सगळे नातेवाईक खूप क्लोज आहेत. त्यामुळे माझ्या करीअर चॉईसबद्दल सगळे जण मला लेक्चर द्यायला लागले. दहावीत मार्क एवढेच पाहिजेत, हेच कॉलेज पाहिजे, असा अभ्यास कर…ब्ला ब्ला ब्ला. खरं सांगू, मला आता प्रेशर आलं आहे. समजा मी हे फील्ड नाही निवडलं किंवा मला मार्क्स कमी आले तर…’’ अनुपने त्याच्या समस्येचे विश्लेषण त्याच्या पद्धतीने केले होते. अनुपला जो ताण आला होता, तो त्याच्याबद्दल असलेल्या सगळ्यांच्या अपेक्षांचा होता आणि त्याला जी भीती (दडपण) बसलेली होती ती ठरवल्यापेक्षा दुसरं निवडल्यावर मिळणाऱया प्रतिसादाची (किंवा खिल्लीची) होती. मुलांची दुसऱयाशी किंवा स्वतशी केलेली तुलना, सततचे सल्ले, दुसऱयांना सांगून त्यांच्याकरवी दिले जाणारे उपदेशाचे डोस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठरविलेल्यापेक्षा बेत बदलण्यावर केला गेलेला आक्षेप किंवा त्याबद्दलची साशंकता मुलांना अजून तणावात घेऊन जाते.
अनुपच्या बाबतीत याची सुरुवात झाली होती. त्याच्या म्हणण्यानुसार त्याचा एक भाऊ ज्याला आधी डॉक्टर व्हायचं होतं, पण नंतर त्याचा बेत बदलला आणि त्याने फार्मसी घेतलं होतं तेव्हा त्याला सगळ्यांनी इतके सल्ले दिले की, शेवटी त्याने स्वतबद्दल सांगणंच बंद केलं. अनुपची स्थिती जरी त्याच्या दादासारखी नसली तरी त्याचा स्वभाव जवळ जवळ त्याच्या दादासारखा होता. संवेदनशील, भिडस्त होता. त्याला आपल्या ध्येयावर गाजावाजा न करता काम करत राहणं जास्त पसंत होतं. मात्र अनवधानाने त्याचा प्लॅन अगोदरच इतरांना कळला आणि त्यावर चर्चामंथन सुरू झालं ते त्याला आवडलं नव्हतं. ‘मला जमलं नाही तर…’ या विचारामुळे तो अधिकाधिक तणावग्रस्त झाला.
अर्थातच, याबद्दल अनुपच्या आई-वडिलांना सांगितलं गेलं. विशेषत त्याच्या वडिलांना जे त्याला आळशी समजून त्याच्यावर अधिक नाराज होते. त्यामुळे त्या दोघांच्या नात्यात कडवटपणा येत चालला होता. अनुपला पुढच्या गोष्टींचे दडपण न घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेच, पण त्याबरोबरच त्याला अतिविचार आणि तणावापासून बाहेर आणण्यासाठी तणाव व्यवस्थापन, अभ्यासाचे नियोजन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘वर्तमानाचा विचार करून क्रियाशील राहणे’ याबाबत जास्तीत जास्त सत्रे घेतली गेली.
या पद्धती, अनुपच्या आई-बाबांचे सहकार्य यामुळे अनुपमध्ये सकारात्मक बदल झाले आणि तो जोमाने अभ्यासाला लागला.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)




























































