
>> अश्विन बापट
मोदक पाणीपुरी, कढी पाणीपुरी, फ्रूट भेळ, भेळभत्ता, थंड भेळ, गरम भेळ, कढी भेळ, पांढऱ्या रंगाची मिसळ… खाद्यपदार्थांमधली ही रुचकर प्रयोगशीलता आहे ठाण्याच्या पुरुषोत्तम राजपूत यांची.
पुरुषोत्तम राजपूत यांच्या पाककलेत वेगळेच वैविध्य जाणवले. त्यांच्या प्रयोगशीलतेबद्दल आणि व्यवसायाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. याची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगताना ते म्हणाले, माझा जन्म चाळीसगावचा. आमच्या घरचा दुधाचा व्यवसाय होता. आजोळी एकत्र कुटुंब होतं. ठाण्यामध्ये एका ठिकाणी दूध विक्री केंद्र होतं. त्या काळी 1970 मध्ये दुधाचे 25 कॅनची विक्री होत असे. त्यातील प्रत्येक कॅनमध्ये 50 लिटर दूध असे. पुढे माझ्या दोन मामांनी मला चाळीसगावहून ठाण्यात आणलं आणि माझ्या आयुष्याची दिशाच बदलली. तेव्हा मी मामांसोबत फिरायला जायचो, त्या काळात मला भेळ या पदार्थाबद्दल आकर्षण वाटू लागलं. मग 1976 मध्ये दहावी झाल्यानंतर मीही स्वयंपाकघरात माझं कसब आजमावू लागलो. मसाला टाकून भेळेत काही वेगळी चव आणता येते का याचा प्रयत्न केला. यातूनच पुढे जन्म झाला झटका भेळेचा. आज माझ्याकडे भेळेचे 25 ते 30 प्रकार आहेत. ज्यात सुकी भेळ, भेळभत्ता, थंड भेळ, गरम भेळ, कढी भेळ असे अनेक प्रकार आहेत. यातल्या कढीभेळेला विशेष मागणी असते. ज्यामध्ये सहा भाज्यांचे किस करून मी ते मिश्रण यात समाविष्ट करतो. या सहा भाज्यांमध्ये पत्ता कोबी, बीट, गाजर, कांदा, कांद्याची पात यासारख्या भाज्या असतात. राजपूत यांचे हे पदार्थ नाशिक, पुणे यासह विविध ठिकाणी मागणीत असतात.
याखेरीज राजपूत यांनी तयार केलेलं श्रीखंडही खास मागणीत असतं. ते दिवसाला 6 ते 10 किलो श्रीखंड तयार करतात. जे ठाण्यातील प्रसादालय हॉटेलला पुरवलं जातं. याखेरीज ऑर्डरनुसार ते श्रीखंड तयार करून देतात. त्यांच्याकडे सध्या या कामासाठी सहा ते सात कामगार आहेत. तसंच हेच सगळे पदार्थ मोठ्या प्रमाणात चाळीसगावात तयार केले जातात. याबद्दल अधिक सांगताना ते म्हणाले, तिथे आमची डेअरी आहे.
आमचे सर्व नातेवाईकच तिकडचं काम पाहतात. ज्यामध्ये मावस भावंडांसह अन्य नातेवाईकही आहेत. चाळीसगावात प्रामुख्याने तूप, श्रीखंड, दूध ही आमची उत्पादनं आहेत. तिथे दिवसाला साधारण दीडशे किलो तूप आणि 100 किलो श्रीखंड तयार होत असतं. फरसाण, शेवेचंही अनेक प्रकार आमच्याकडे आहेत. आमच्याकडच्या पदार्थांपैकी काही पदार्थ त्यांच्या ताजेपणावर अवलंबून असल्याने त्यांच्या ऑर्डर्स आल्यावरच मी ते तयार करत असतो. माझा पाववडा नावाचा पदार्थही डिमांडमध्ये असतो. पाव बेसनात बुडवून तळून घ्यायचा आणि त्याचे तुकडे करून त्यात बटाटा भाजी भरून ती सर्व्ह केली जाते. ती लोकांना प्रचंड आवडते.
पुढच्या काळात मोदक मिसळसारखा आगळावेगळा पदार्थ खवय्यांसाठी तयार करून देण्याचा माझा मानस आहे, असंही गप्पांची सांगता करताना राजपूत यांनी सांगितलं.