मालेगावला एमआयएम उमेदवारावर हल्ल्याचा प्रयत्न

मालेगाव येथे प्रचार संपून काही तास उलटत नाही तोच बुधवारी पहाटे एमआयएम उमेदवार विशाल अहिरे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मालेगावच्या प्रभाग क्रमांक 4 ‘ड’मध्ये विशाल बाबुराव अहिरे हे एमआयएमचे उमेदवार आहेत. ते बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास मतदान प्रतिनिधींची बैठक आटोपून सायने येथे घराकडे कारने निघाले होते. नाशिक-मुंबई महामार्गावरील दरेगाव-चाळीसगाव फाटादरम्यान अचानक पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कारवर दगडफेक केली. मात्र, अहिरे यांनी प्रसंगावधान राखत कार वेगात पुढे नेल्याने बचावले. या हल्ल्यात कारची मागची काच फुटून नुकसान झाले. अहिरे यांनी सकाळी पवारवाडी पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दगडफेक झालेल्या भागात सीसीटीव्ही नाहीत. अंधाराचा फायदा घेऊन हे पृत्य केल्याचे दिसून येत आहे. घटनेचा सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती निरीक्षक राहुल खताळ यांनी दिली.