
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टी सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनुष्काच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती, जी आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. वयाच्या 44 व्या वर्षी अनुष्काने लग्नाचा निर्णय घेतला असून ती एका प्रतिष्ठित व्यावसायिकासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे.
अनुष्का शेट्टीचे नाव गेल्या अनेक वर्षांपासून तिचा सह-कलाकार प्रभाससोबत जोडले जात होते. ‘बाहुबली’ चित्रपटातील या दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहून हे दोघे रिअल लाईफमध्येही लग्न करतील, अशी चर्चा वारंवार रंगत होती. मात्र, प्रभास आणि अनुष्का या दोघांनीही नेहमीच आपण फक्त चांगले मित्र असल्याचे स्पष्ट केले होते. प्रभाससोबतच्या अफेअरच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून अनुष्काने चित्रपट सृष्टीबाहेरील व्यक्तीची निवड करून सर्वांना चकीत केले आहे.
अनुष्का ज्या व्यक्तीशी लग्न करणार आहे, तो एक बिझनेसमन असल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप त्याचे नाव समोर आलेले नाही. दोघेही गेल्या काही काळापासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती आहे. अनुष्का सध्या तिच्या प्रलंबित प्रोजेक्टचे काम पूर्ण करत असून त्यानंतर ती लग्नाच्या तयारीला लागणार आहे.
अभिनेत्रीने अद्याप लग्नाबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सोशल मीडियावर तिच्या लग्नाची प्रचंड चर्चा आहे. 44 व्या वर्षी आयुष्याची नवी सुरुवात करण्याच्या तिच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. देवसेना म्हणून घराघरात पोहोचलेली ही लाडकी अभिनेत्री आता खऱ्या आयुष्यात ‘वधू’च्या रूपात कधी दिसणार, याची चाहते वाट पाहत आहेत. लवकरच या लग्नाची तारीख आणि ठिकाण जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




























































