फसवणूक कंबोडियातून आणि बँक खाती सुरत-अहमदाबादमधून; पदवीधर तरुण कमिशनसाठी ठगांना पुरवायचे बँक खाती

टास्कच्या नावाखाली कंबोडिया या देशातून फसवणूक केल्यावर अहमदाबाद आणि सुरत येथून सायबर ठगांना बँक खाते उपलब्ध करून देणाऱया तिघांना बांगूरनगर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. उत्तम सखिया, रितेश वाघलिया आणि साहिल कछाडिया अशी त्या तिघांची नावे आहेत. बँक खाते पुरवण्याच्या मोबदल्यात त्या तिघांना लाख रुपये आणि कमिशन मिळत होते अशी माहिती तपासात समोर आली आहे.

तक्रारदार या गोरेगाव येथे राहतात. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी मोबाईलवर घरबसल्या पैसे कमवण्याची जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीवर क्लिक केल्यावर त्यांना मेसेज येऊ लागले. जाहिराती बघा आणि तुम्हाला पैसे मिळतील असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना मोबाईलवर लिंक पाठवली. सुरुवातीला त्याने चार जाहिराती पाहिल्या. त्या जाहिराती पाहिल्यावर त्यांना 120 रुपये पाठवण्यात आले. तसेच त्यांना टेलिग्राम ऍपवरील व्हीआयपी ग्रुपमध्ये जोडले गेले. सुरुवातीला त्यांना टास्क देण्यात आले. टास्कसाठी काही रक्कम जमा करावी लागेल असे त्यांना सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून त्याने रक्कम जमा केली. टास्कवर मिळालेली रक्कम त्यांना दिसत होती. जर टास्क चुकला तर ते खाते बंद होईल.

पुन्हा नवीन खाते खोलण्यासाठी पैसे द्यावे लागतील असे त्यांना सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्याने 5 लाख 68 हजार रुपयांची गुंतवणूक केली. जमा झालेली रक्कम काढायचा त्या प्रयत्न करत होत्या. मात्र रक्कम निघत नव्हती. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बांगूरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक प्रतोद तावडे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक विवेक तांबे, किशोर तावडे यांनी तपास सुरू केला. फसवणुकीचे काही पैसे हे उत्तमच्या खात्यात जमा झाल्याची माहिती मिळाली. त्या माहितीनंतर तांबे यांचे पथक अहमदाबाद येथे गेले. तेथे फिल्डिंग लावून उत्तमच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या चौकशीत रितेशचे नाव समोर आले. त्यालादेखील पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. त्यानंतर पोलिसांनी सुरत येथून साहिलला ताब्यात घेऊन अटक केली.

अटक केलेले तिघे पदवीधर असून ते ठगांना बँक खाते पुरवत असायचे. त्याच्या मोबदल्यात एक लाख रुपये आणि कमिशन म्हणून काही रक्कम मिळत होती. त्या तिघांना कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.