मोबाईलच्या स्क्रीनवर रंगतोय उमेदवारांचा प्रचार! डिजिटल रणांगणात पोस्टर्स, व्हिडीओ, रील्सचा महापूर

सध्या डिजिटल युग आहे. यंदाची निवडणूक ही एआयच्या काळात होत असल्याने अनेक उमेदवारांचा प्रचार हा मोबाईलच्या स्क्रीनवर रंगताना दिसत आहे. मुंबई महापालिकेची ही निवडणूक आता पारंपरिक विरुद्ध टेक्नोलॉजी, घोषणा विरुद्ध अल्गोरिदम आणि रॅली विरुद्ध रील्स अशी बहुरंगी पाहायला मिळत आहे. रस्त्यांवर ढोलताशांचा गजर, तर मोबाईल स्क्रीनवर एआय निर्मित पोस्टर्स, व्हिडीओ आणि रील्स असा हा प्रचाराचा नवा अवतार मुंबईकर अनुभवत आहेत. डिजिटल रणांगणात मोबाईलवर उमेदवारांचे पोस्टर्स, व्हिडीओ आणि रील्सचा महापूर पाहायला मिळत आहे.

मुंबईसह राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. मतदानासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवारांकडून रॅली, पदयात्रा आणि सभेचे आयोजन केले जात आहे. मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचता यावे यासाठी उमेदवार सर्वच मार्गांचा अवलंब करताना दिसत आहे. अनेक उमेदवारांनी डिजिटल प्रचाराला प्राधान्य दिले आहे. डिजिटल माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एआयची मदत घेतली आहे. मोबाईलद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप, फेसबुक, इन्स्टाग्रामचा वापर केला आहे. यंदाची ही निवडणूक केवळ राजकीय लढत न राहता तंत्रज्ञान, डिजिटल माध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांची महास्पर्धा बनली आहे. पारंपरिक प्रचारासोबतच उमेदवारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणावर वापर सुरू केल्याने प्रचाराचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे.

एआयचा सर्रास वापर

आधीच्या निवडणुकीत जाहिरात एजन्सीची मदत घेतली जात होती, परंतु आता अनेक उमेदवार हे स्वतःच एआय टूल्स वापरून पोस्टर्स, व्हिडीओ, रील्स, भाषांतर, ग्राफिक्स, स्लोगन हे सगळे काही अवघ्या काही मिनिटांमध्ये तयार करत आहेत. एआयमुळे मजेशीर संवाद आणि कॉमिक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एआयचा जसा चांगला वापर होतो. तसा त्याचा वाईट वापरही केला जात आहे. खोटे व्हिडीओ, बनावट आवाज, चुकीची विधाने दाखवणाऱया क्लिप्स यामुळे मतदारांची दिशाभूल होण्याची भीती आहे. डीपफेक आणि खोटय़ा व्हिडीओंचा धोका वाढल्याने बनावट आवाज आणि दिशाभूल करणाऱया क्लिप्समुळे मतदार गोंधळात पडण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअॅपवर प्रचाराचा महापूर

प्रचारासाठी व्हॉट्सअॅपपासून इन्स्टाग्रामचा वापर केला जात आहे. यंदाच्या निवडणुकीची खरी रणभूमी ही मोबाईलवर पाहायला मिळत आहे. याआधी भिंतीवर पोस्टर लावले जात होते, परंतु तेच पोस्टर अवघ्या काही सेपंदांत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पोहोचवले जात आहे.

व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूटय़ूब या माध्यमांवर उमेदवारांचे पोस्टर्स, व्हिडीओ, रील्स आणि मेसेज मोठय़ा प्रमाणावर फिरत आहेत.

व्हॉट्सअॅप, फेसबुक, यूटय़ूबवर रील्स, व्हिडीओ आणि पोस्टर्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. युवकांना आकर्षित करण्यासाठी मिम्स, ट्रेंडी गाणी आणि फास्ट कट एडिटिंगचा मोठय़ा प्रमाणात वापर होत आहे. वॉर्डनिहाय ग्रुप, मतदारनिहाय संदेश, व्हॉईस नोट्स आणि लघु व्हिडीओ क्लिप्सद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नवे तंत्र वापरले जात आहे.

एआयच्या संभाव्य धोक्यांमुळे निवडणूक आयोगाने एआय वापराबाबत कडक भूमिका घेतली आहे. एआय निर्मित मजकूर असल्यास तसा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे. डीपफेक वापरल्यास डिस्क्लेमर आवश्यक आहे. दिशाभूल करणारा पंटेंट गुन्हा ठरू शकतो. एआय निर्मित मजकूर असल्यास त्याचा स्पष्ट उल्लेख करणे आणि नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे.