अर्थसंकल्पातून इलेक्शनवर सरकारचा डोळा; निवडणूक असलेल्या पश्चिम बंगाल, तामीळनाडूवर अर्थमंत्री मेहेरबान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात लवकरच पश्चिम बंगाल, आसाम, तामीळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपचा पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीवर डोळा आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा गड काबीज करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यामुळे या प्रदेशांवर अर्थसंकल्पात काय तरतुदी असतील याबाबत चर्चा रंगली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अपेक्षेनुसार हमखास या राज्यांना बऱयाच गोष्टी दिल्या आहेत. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरपासून हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरपर्यंत अनेक मोठय़ा घोषणांचा पाऊस सीतारामन यांनी पाडला.

अर्थसंकल्पात दक्षिणेवर प्रेम

निर्मला सीतारामन यांनी तामीळनाडूला हायस्पीड रेल्वेशिवाय अनेक गोष्टी दिल्या आहेत. तामीळनाडू, ओडिशा, केरळ आणि आंध्र प्रदेशात दुर्मिळ खनिजांसाठी विशेष कॉरिडॉर बनवण्यात येतील. तामीळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या सीमेजवळच्या पुलिकट सरोवराच्या आसपास पक्षी पाहण्यांसाठी विशेष ट्रेल्स विकसित करण्यात येतील. नारळ, काजू आणि कोको यासारख्या पिकांचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. या गोष्टी केरळ आणि तामीळनाडूमध्ये मोठय़ा प्रमाणात आहेत. याशिवाय पाच क्षेत्रिय मेडिकल हब बनवण्यात येणार आहेत. याचा फायदा केरळसारख्या राज्याला सर्वाधिक होणार आहे.

हायस्पीड रेल्वे

निर्मला सीतारामन यांनी पश्चिम बंगाल आणि तामीळनाडूमध्ये हायस्पीड रेल्वेची घोषणा केली. उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि पश्चिम बंगालमधील सिलिगुडी या शहरांना हायस्पीड रेल्वेने जोडण्यात येणार आहे, तर तामीळनाडूला बंगळुरू-चेन्नई आणि हैदराबाद-चेन्नई अशा दोन कॉरिडॉरची भेट मिळाली आहे.

आसामसाठी काय?

भाजपला आसाममध्ये सत्तेची हॅटट्रिक करायची आहे. ईशान्येकडील सध्याची परिस्थिती पाहता भाजपला आसाम कोणत्याही परिस्थितीत गमावायचे नाही. आसामच्या तेजपूरमध्ये मानसिक आरोग्य आणि ट्रॉमा केअरसाठी ‘निम्हान्स-2’ ची घोषणा केली. याशिवाय ईशान्येकडील राज्यांमध्ये बुद्ध सर्किट विकासासाठी योजना सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

बंगालवर खास नजर

अर्थमंत्र्यांनी बंगालच्या दानकुनीपासून सुरतपर्यंत असा पूर्व-पश्चिमेला जोडणारा नवा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर बनवण्याची घोषणा केली. यामुळे बंगालपासून गुजरातपर्यंत मालवाहतूक वेगाने होणार आहे. यात गुजरातलादेखील बराच लाभ होणार आहे. याशिवाय ईस्ट-कोस्ट औद्योगिक कॉरिडॉरदेखील विकसित करण्यात येणार आहे. त्यात दुर्गापूर हे महत्त्वाचे केंद्र राहणार आहे. दुर्गापूर हे पश्चिम बंगालमधील महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे.

ते केवळ शब्दांचे ‘बाजीगर’; विरोधकांच्या प्रतिक्रिया

तीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरबद्दलची घोषणा फसवी आहे. हे प्रकल्प आधीपासूनच सुरू आहेत. त्यांनी बंगालला एक पैसाही दिलेला नाही. फक्त एकच कर आहे, जीएसटी. ते आमचाच पैसा घेतात आणि बढाया मारतात.  हा आमचा पैसा आहे. बंगालमधून पैसा घेतात; मात्र आम्हाला पूर्ण फंड देत नाहीत. ते केवळ शब्दांचे ‘बाजीगर’ आहेत. त्यांना सरकार चालवण्याचा कोणताही अधिकार नाही.

ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री पश्चिम बंगाल

हा अर्थसंकल्प गरीब आणि गावांमध्ये राहणाऱयांना समजण्याच्या पलीकडचा आहे. या अर्थसंकल्पातून कोणतीही नोकरी किंवा रोजगार दिलेला नाही. हे स्वप्ने दाखवणारे बजेट आहे. ज्या सरकारकडून कोणतीही अपेक्षा नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? हे बजेट फक्त पाच टक्के लोकांसाठी बनवले आहे.

अखिलेश यादव, अध्यक्ष, समाजवादी पार्टी

केरळसाठी हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे. गेल्या 10 वर्षांपासून केरळसाठी ‘एम्स’चे आश्वासन देण्यात येत आहे. मात्र, या अर्थसंकल्पात त्याचा उल्लेख नाही. पर्यटन, विमान वाहतूक, आरोग्य यांसारख्या क्षेत्रात केरळचे मोठे योगदान आहे. तरीही केरळसाठी ठोस तरतूद नाही.

के. सी. वेणुगोपाल, खासदार, काँग्रेस

पायाभूत सुविधांना हायस्पीड कधी?

अर्थसंकल्पात हायस्पीड ट्रेनचे गाजर दाखवत मोठय़ा घोषणा करण्यात आल्या, मात्र मुंबई आणि महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांसाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आली नाही. पायाभूत सुविधांची स्थिती पाहता त्यावर भर देण्याची गरज होती, मात्र पुन्हा एकदा निराशा झाली. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

सुनील प्रभू, शिवसेना नेते व मुख्य प्रतोद