
शिवाजी पार्क जिमखान्याच्या क्रिकेट संस्कृतीतून घडलेल्या हिंदुस्थानी कसोटीपटू श्रेयस अय्यर आणि रणजीपटू सिद्धेश लाड यांच्या हस्ते एसपीजी रोझमर्क क्रिकेट अकादमीच्या 48 युवा क्रिकेटपटूंना क्रिकेट साहित्याचे वितरण करण्यात आले. शिवाजी पार्क जिमखाना आणि रोझमर्क एसपीजी क्रिकेट अकादमीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुण खेळाडूंच्या स्वप्नांना बॅट-बॉलची ताकद आणि प्रेरणा मिळाल्याची भावना उमटली.
या कार्यक्रमाप्रसंगी श्रेयस अय्यरने आपल्या आठवणी जागवल्या. तो म्हणाला, सुरुवातीला शिवाजी पार्क जिमखान्याच्या अकादमीत माझी निवड झाली नव्हती, पण मी हार मानली नाही. इंडियन जिमखान्याकडून खेळताना शिवाजी पार्कविरुद्धच्या सामन्यात चांगली खेळी केल्यानंतर माजी कसोटीपटू प्रवीण अमरे यांनी मला बोलावून घेतले आणि अकादमीत प्रवेश दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी पुढे हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करू शकलो.
सिद्धेश लाडनेही आपल्या आठवणी ताज्या केल्या. माझे वडील आणि प्रशिक्षक दिनेश लाड यांनी मला शिवाजी पार्क जिमखान्याच्या अकादमीत प्रवेश घ्यायला सांगितले. प्रवीण अमरे यांच्या मार्गदर्शनाखालीच माझ्या क्रिकेट कारकिर्दीची मजबूत पायाभरणी झाल्याचे सिद्धेशने अभिमानाने सांगितले.
अकादमीचे प्रमुख आणि जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण अमरे यांनीही आपल्या संवादात युवा खेळाडूंना प्रोत्साहन दिले. श्रेयस अय्यर आणि सिद्धेश लाड यांनी याच अकादमीतून प्रशिक्षण घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले. त्यांच्या यशातून प्रेरणा घ्या, असा सल्ला दिला. याप्रसंगी जिमखान्याचे सरचिटणीस संजीव खानोलकर, सहाय्यक चिटणीस सुनील रामचंद्रन, विश्वस्त लता देसाई व प्रकाश नायक, खजिनदार विलास सोमण, उपाध्यक्ष विश्वास नेरूरकर, इनडोअर विभागाचे चिटणीस सुनील समेळ तसेच अकादमीचे प्रायोजक रोझमर्कचे पूर्वेश शेलटकर उपस्थित होते.





























































