
हिंदुस्थानच्या लष्करात कार्यरत असलेल्या कर्नलच्या केबिनमधून पिस्तूल, काडतुसे आणि चांदीचे दागिने चोरी करणाऱया दोघांना क्राईम ब्रँच युनिट 12ने अटक केली. दीपक धवने आणि विनायक बाविस्कर अशी त्यांची नावे आहेत. तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याला त्याच्या पालकाच्या स्वाधीन केले.
मालाडला आर्मी कॅम्प आहे. त्या कॅम्पमध्ये राहणारे तक्रारदार हे सुभेदार म्हणून काम करतात. त्यांच्या परिचित एक कर्नल असून त्याचे एक केबिन आहे. आठ दिवसांपूर्वी काही अज्ञात व्यक्तींनी तेथे प्रवेश केला. त्यानंतर केबिनमधील कपाटातून एक पिस्तूल, काडतुसे, पैसे आणि चांदीचे दागिने घेऊन पळ काढला. हा प्रकार लक्षात येताच कर्नल याच्या वतीने सुभेदार यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दिंडोशी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. आर्मीच्या कॅम्पमधून चोरी झाल्याने त्याची गंभीर दखल मुंबई पोलिसांनी घेतली.
याचा समांतर तपास युनिट 12 करत होते. वरिष्ठ निरीक्षक सचिन गवस यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत, सहाय्यक निरीक्षक विजय रासकर, समीर मुजावर, उपनिरीक्षक अजय सावंत आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी दीपक, विनायकला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत आणखी एका अल्पवयीन मुलाचे नाव समोर आले. पोलिसांनी त्या दोघांकडून पिस्तूल, काडतुसे, आणि चांदीचे दागिने जप्त केले आहेत. त्या दोघांना पुढील कारवाईसाठी दिंडोशी पोलिसांच्या स्वाधीन केले.
चोरीनंतर गेले गोव्याला
कर्नलच्या केबिनमधून ऐवज चोरल्यानंतर त्या तिघांनी गोव्याला जायचे ठरवले. ठरल्यानुसार ते तिघे गोव्याला गेले. तेथे काही दिवस मौजमजादेखील केली. मौजमजा करून ते मुंबईत आल्यावर अल्पवयीन मुलासह त्या दोघांना युनिट 12ने ताब्यात घेतले. दीपक आणि विनायकविरोधात घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत.



























































