
दिल्ली-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी एक भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव वेगात असलेली बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरील ट्रकला जोरदार धडकली. या भीषण धडकेत बस चालकाचा जागीच मृत्यू झाला असून 30 ते 40 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस नाशिकहून नेपाळच्या दिशेने जात होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि बसच्या खिडक्या व आपत्कालीन दरवाजातून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
Kanpur, Uttar Pradesh: A road accident took place on the Delhi–Kanpur National Highway when a speeding bus lost control and collided with a truck. Around 30 to 40 passengers on board the bus were injured in the accident, with two reported to be in critical condition pic.twitter.com/wenprp4Xlm
— IANS (@ians_india) March 14, 2026
घटनेची माहिती मिळताच पनकी पोलीस ठाण्यातील पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले आणि बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. मृत चालकाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, त्यांच्या कुटुंबीयांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वेग जास्त असल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. मात्र, पोलीस आता प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने अपघाताच्या इतर कारणांचाही शोध घेत आहेत.
हा अपघात कानपूरमधील पनकी पोलीस स्टेशन हद्दीतील सरायमीता भागात घडला. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये 50 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



























































