
>> डॉ. अनिल कुलकर्णी
पुण्यात काही दिवसांपूर्वी एका बाल साहित्य महोत्सवाचे उद्घाटन भावार्थ व संवादतर्फे आयोजित केले होते. आराध्या नंदकर, साची भांड व पालवी मालुंजकर या तीन मुलींनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. राजीव तांबे यांनी या तीनही मुलींची साहित्यिक म्हणून मुलाखत घेतली. अनेक बाल साहित्य संमेलनातूनही मुलांची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत. असे उपक्रम प्रेरणेने वारंवार घडायला हवेत. पुस्तक प्रदर्शनातही आता मुला-मुलींचे साहित्यिक म्हणून पुस्तके स्टॉलवर ठेवली जातात. मुले लिहीत आहेत ती केवळ प्रेरणेमुळेच. समृद्ध माणसांचा राबता घरात असण्याबरोबरच पुस्तकांचाही राबता घरात असेल तर मुले वाचू लागतात, लिहू लागतात. सृजन प्रकाशनतर्फे नामदेव माळी यांनीसुद्धा लहान मुलांची बरीच पुस्तके प्रकाशित केली आहेत.
प्रेरणेचे खत मिळाले की व्यक्तिमत्त्व बहरतेच. असामान्य व्यक्ती इतिहास घडवितात; पण जेव्हा सामान्यसुद्धा इतिहास घडवितात तेव्हा ती प्रेरणाच असते. प्रेरणेच्या पायवाटा निर्माण करणाऱयांमध्ये वय कधीच आड येत नाही. डी. गुकेश याने वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धिबळात विश्वविक्रम केला. कधी अनुवंशिकतेतून किंवा कधी कठोर परिश्रमातून प्रेरणेची पायवाट नकळत निर्माण होते.
लहान मुलेसुद्धा कोणाची ना कोणाची तरी प्रेरणा घेऊन स्वत पायवाट निर्माण करतात. अशीच कहाणी आहे आराध्या राजीव नंदकर हिची, जिने अकराव्या वर्षी 140 पानांचे पुस्तक लिहून इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. आराध्या राजीव नंदकर वय 11 वर्षे, या छोटय़ा लेखिकेच्या ‘सारा पार्कर अँड द मॅजिकल ओरब’ या मोठय़ा पुस्तकाने पुणे येथील पुस्तक महोत्सवात वाचकांचे लक्ष वेधले. एकाच दिवशी तिच्या पुस्तकाच्या शंभर प्रती हातोहात खपल्या. आराध्या व इतर बाल साहित्यिक हे वाचन संस्कृती लोप पावत असलेल्या सोशल मीडियाच्या जगात एक आशेचा किरण आहेत. अनेक लहान मुले तिचे पुस्तक उपलब्ध असलेल्या स्टॉलला भेट देत होते व तिच्याशी संवाद साधून प्रेरणा घेताना आढळून आले. मुलांची मोबाइलपासून सुटका करून घ्यायची असेल तर मुलांच्या हातात पालकांनी मोबाइलऐवजी पुस्तक दिले पाहिजे. मुले ही आपल्या देशाचे भवितव्य असून पुस्तके ही त्यांच्यावर मूल्यसंस्कार रुजवणारी मोठी माध्यमे आहेत. आराध्या नंदकर ही पुस्तक वाचन, सोबतच पेंटिंग आणि ट्रेकिंग करते. तसेच ती कराटेमध्येही ब्लॅक बेल्ट आहे. भविष्यात तिला लेखिका व्हायचे असून आपल्या देशाचे नाव साहित्य जगात मोठे करण्याचे ध्येय आहे. आराध्याचे वडील राजीव नंदकर व तिची आई यांच्या प्रोत्साहनामुळे ती लिहिती झाली.
अशीच कामगिरी साची भांड हिने ‘साचीच्या गोष्टी’ तसेच पालवी मालुंजकर या बाल साहित्यिकांनीही आपली पुस्तके प्रकाशित करून केली आहेत. साची व पालवी यांचे आजोबा प्रसिद्ध साहित्यिक बाबा भांड असल्यामुळे पुस्तकांच्या सहवासातच या दोघींचा लेखन प्रवास सुरू झाला. पालवी ही ब्लॉग रायटर आहे. तिने ‘सर्जक पालवी’ हे कोविडच्या काळात ब्लॉग लिहिले व पुस्तक प्रसिद्ध केले. पालवीच्या पुस्तकाप्रमाणेच अनेक मुलांच्या पुस्तकांची दखल प्रकाशक घेत आहेत. या सर्व बाल साहित्यिकांच्या पाऊलखुणा पुढे दुसऱ्यांसाठी पायवाट म्हणूनच राहणार आहेत. सोनाली गावडे हिने ‘माझी दैनंदिनी’ लिहायला सुरुवात केली ते शिक्षकाच्या प्रोत्साहनामुळे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार तिला मिळाला आहे. तिचे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा ती सातवीत होती. मुले वाचत नाहीत कसे म्हणता येईल? मुले वाचत आहेत व लिहीतही आहेत. प्रोत्साहनाच्या जेवढय़ा पायवाटा निर्माण करता येतील तेवढय़ा आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी, पालकांनी व समाजातील घटकांनी निर्माण करायला हव्यात.