देश विदेश- इलॉन मस्क ‘एक्सएआय’ कंपनी नव्याने उभारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इलॉन मस्क यांच्या एआय कंपनी एक्सएआयमध्ये मोठय़ा प्रमाणात उलथापालथ सुरू आहे. कंपनीत नेतृत्व बदल आणि राजीनाम्याची  मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मस्क यांनी कंपनी नव्याने उभारण्याचे ठरवले आहे. मस्क यांनी स्वतः मान्य केले की, कंपनीची रचना योग्य नव्हती. त्यामुळे कंपनीची पुनर्रचना केली जाणार आहे.  आता मस्क यांनी यापूर्वी नोकरीसाठी नाकारलेल्या काही प्रतिभावंत उमेदवारांची पुन्हा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

विचित्र अपघातात तीन पोलिसांचा मृत्यू `

बंगळुरूच्या चित्रदुर्ग जिह्यातील हेग्गरे परिसरात सोमवारी झालेल्या भीषण अपघातात राज्य राखीव पोलीस दलातील तीन उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. बंगळुरूहून बळ्ळारीकडे प्रवास करणाऱया पोलिसांची गाडी पुढे जाणाऱया ट्रकला जोरात आदळली. टक्कर एवढी जोरदार होती की, मोटर पुढे 300 मीटरपर्यंत ओढली गेली. अपघातात अमरेश, मंजुनाथ आणि सचिन या तीन पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू झाला.

बदलत्या हवामानाने लिचीसंकटात

बदलत्या हवामानामुळे ‘लिची’ फळाला चांगलाच फटका बसला आहे. लिचीच्या झाडांना फुले तर आली आहेत. मात्र त्याचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत खूप कमी आहे. त्यामुळे बिहारमधील शेतकऱयांचे टेन्शन वाढले आहे. कृषी तज्ञांचे म्हणणे आहे, थंडीच्या सुरुवातीला तापमान जास्त राहिल्याने अनेक ठिकाणी झाडांची पाने गळाली. त्यामुळे फुले, मंजिरी बनवण्याची प्रक्रिया मंदावली. त्यामुळे आता शेतकऱयांना खूप काळजी घ्यावी लागेल, जेणेकरून उरलेले पीक तर हाती लागेल.

देवभूमी उत्तराखंड फुलदेईउत्सवात न्हाऊन गेली

उत्तराखंडात निसर्गाचा उत्सव फुलदेई मोठय़ा प्रमाणात साजरा केला जात आहे. चिमुकल्यांच्या किलबिलाटाने आणि फुलांच्या सुगंधाने देवभूमी न्हाऊन निघाली आहे. उत्सवाच्या निमित्ताने चिमुकल्यांनी सकाळी रानावनातून, बागेतून पियुली, बुरांश आणि अन्य रंगीबेरंगी फुले गोळा केली. मुले टोळ्या बनवून गावातील प्रत्येक घरी जातात आणि तिथल्या उंबऱयावर फुले अर्पण करतात. या वेळी ‘फुलदेई छम्मा देई’ हे लोकगीत म्हणतात. याचा अर्थ घर फुलांसारखे फुलो, समृद्धी येवो. या बदल्यात घरातील मोठी माणसे गूळ, मिठाई आणि पैसे आशीर्वाद म्हणून देतात.