
‘जुनं ते सोनं’ ही म्हण आजच्या अस्वस्थ वर्तमानात अधिक ठळकपणे जाणवते. धावपळीच्या आयुष्यात, नात्यांमध्ये वाढलेले अंतर आणि मनावरचा ताण वाढत असताना भूतकाळातल्या आठवणी माणसाला उभारी देतात. विशेषतः संगीत ही अशी शक्ती आहे, जी क्षणात माणसाला त्याच्या हळव्या कप्प्यात घेऊन जाते. शंकर-जयकिशन या अजरामर संगीतकार जोडीच्या गाण्यांत हीच जादू आहे. त्याच
नॉस्टॅल्जियाचा आधार घेत रंगभूमीवर आलेलं नवं नाटक म्हणजे ‘शंकर जयकिशन’. नावाचा कथानकाशी थेट संबंध नसला तरी त्यांच्या गाण्यांचा भावनिक संदर्भ नाटकात महत्त्वाची भूमिका बजावतो.
नाटकाची कथा महादेव आणि शामसुंदर या दोन जिवलग शाळूसोबती मित्रांभोवती गुंफलेली आहे. एकाच गावात वाढलेले हे दोघे आयुष्याच्या प्रवासात वेगवेगळ्या वाटांवर जातात. महादेव मुंबईत स्थिरावतो, नोकरी, संसार करतो; तर शामसुंदर गावाशी, मातीशी आणि जुन्या मूल्यांशी नातं जपून ठेवतो. पत्नीच्या निधनानंतर निवृत्त झालेला महादेव एकाकी, गोंधळलेला आणि भावनिकदृष्टय़ा कोलमडलेला आहे. त्याची मुलगी ईशा वडिलांची काळजी घेत त्यांना आपल्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेते. मात्र पत्नीच्या आठवणींनी भरलेलं घर सोडणं महादेवला जड जातं. यावरुन त्यांच्यात वाद होतात. या तणावाच्या क्षणी शामसुंदरचा त्या घरात प्रवेश होतो आणि नाटकाला नवी दिशा मिळते.
शामसुंदरच्या येण्याने महादेवच्या आयुष्यातला ताण हळूहळू कमी होऊ लागतो. दोघांच्या संवादांतून त्यांचा भूतकाळ, आयुष्यातील अपयश, न बोललेल्या वेदना आणि मैत्रीचा खोल अर्थ उलगडत जातो. या भावनिक नाटय़ात लेखकाने एक रहस्यही गुंफलेलं आहे, जे शेवटाकडे जाताना उलगडतं आणि कथेला एक समाधानकारक शेवट लाभतो. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक शंकर-जयकिशन यांच्या लोकप्रिय गाण्यांचा वापर अनेक ठिकाणी भावनांना अधोरेखित करतो; मात्र काही प्रसंगांत तो अधिक सुसंगत असायला हवा होता. कधी कधी ही गाणी कथेत नैसर्गिकपणे न मिसळता ठिगळ लावल्यासारखी वाटतात.
लेखक विराजस कुलकर्णी यांची संकल्पना संवेदनशील आहे. मात्र पहिल्या अंकात काही प्रसंगांमध्ये गोंधळ जाणवतो. दिग्दर्शकाला योग्य तो तर्क न देता आल्यामुळे तो गोंधळ आहे, पण त्यावरही काम करता येईल. संवादांची पुनरुक्ती, न
दिसणाऱया पात्रांचे वारंवार उल्लेख आणि विनोदासाठी केलेल्या काही वाक्यरचना अपेक्षित परिणाम साधत नाहीत. काही पंचेस आणि वन लायनर्स मात्र अफलातून आहेत. उत्तरार्धात नाटकाचा वेग वाढतो, प्रश्नांची उत्तरं मिळू लागतात आणि प्रेक्षक
भावनिकदृष्टय़ा कथेशी जोडला जातो.
अभिनेते भरत जाधव आणि तब्बल 29 वर्षांनंतर रंगभूमीवर परतलेले महेश मांजरेकर या दोन दिग्गज कलाकारांमुळे नाटकाला वेगळंच बळ मिळतं. मांजरेकरांचा सहज वावर, रांगडी भाषा, प्रसंगांना दिशा देणारी भूमिका लक्षात राहते. भरत जाधव यांनी परिस्थितीशरण पण अंतर्मुख महादेव अत्यंत संयत, प्रभावीपणे साकारला आहे. शिवानी रांगोळे या दोघांच्या मधे आपली स्वतंत्र ओळख ठसठशीतपणे निर्माण करते. पात्रांच्या हालचालींना पूरक असं नेपथ्य आणि प्रकाश परिणामात भर घालतात.
दिग्दर्शक सूरज पारसनीस यांना दुसऱया अंकात सूर गवसला आहे. पहिल्या अंकाची बांधणी अधिक काटेकोर केली तर नाटक आणखी प्रभावी ठरू शकतं यावर लेखक-दिग्दर्शकांनी विचार करायला हवा. नाटकात एक तरी स्वतंत्र गाणं – थीम
साँग हवंच या नव्या रचनेनुसार एक गाणंही आहे, जे नाटकाची पकड अधिक घट्ट करतं.
जुनी दुःखं कुरवाळत न बसता, परस्परांच्या सोबतीनं आयुष्य नव्यानं सुरू करण्याचा आशय मांडणारं आणि तरीही हळवी भावनिक साद घालत, प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावणारं ‘शंकर जयकिशन’ हे नाटक एकदा तरी पाहायला हवंच.
n लेखक ः विराजस कुलकर्णी
n दिग्दर्शक ः सूरज पारसनीस
n कलाकार ः भरत जाधव, शिवानी
n रांगोळे आणि महेश मांजरेकर
n नेपथ्य ः संदेश बेंद्रे
n प्रकाश ः शाम चव्हाण
n गीत ः क्षितिज पटवर्धन
n संगीत ः अजित परब
n निर्माते ः भरत जाधव एंटरटेनमेंट
n सूत्रधार ः अनुदीप जाधव






























































