Farooq Abdullah Attacked – सरकारला त्यांना मारायचे आहे का? मल्लिकार्जुन खरगे यांचा संसदेत संतप्त सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी रात्री झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे पडसाद आज संसदेत उमटले. काँग्रेस नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. “जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कोलमडली असून, सरकारचा इरादा फारुख अब्दुल्ला यांना मारण्याचा आहे का?” असा गंभीर सवाल खरगे यांनी यावेळी विचारला.

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. तरीही एका माजी मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारे हल्ला होणे हे धक्कादायक आहे. जर स्थानिक सुरक्षा रक्षकांनी तत्परता दाखवली नसती तर, हल्लेखोरांनी फारुख अब्दुल्ला यांचा जीव घेतला असता. जे लोक लोकशाही आणि समाजवाद वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनाच संपवण्याचे काम केले जात आहे का? असा आरोप राज्यसभेत बोलताना खरगे यांनी केला. तसेच, केंद्र सरकारच्या हाती कश्मिर सुरक्षित नसल्याने त्यांचा राज्याचा दर्जा तातडीने बहाल करण्याची मागणी खरगे यांनी केली.

खर्गे यांच्या आरोपांना उत्तर देताना केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. “काल रात्री घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. केंद्र सरकार या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असून, या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. हल्लेखोरांचा नेमका हेतू काय होता, याचा शोध घेतला जात आहे,” असे जेपी नड्डा म्हणाले.