
आसामच्या थधेकिअजुली येथील व्यक्तीवर हसण्याची इमोजी वापरत प्रतिक्रिया दिली म्हणून गुन्हा दाखल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कोकराझारच्या जिल्हा उपायुक्त वरनाली डेका यांनी मेकअप केला नसल्याबद्दल फेसबुकवर केलेल्या कमेंटला रिप्लाय देताना एका व्यक्तीने हाहा असा इमोजी वापरला होता.
अमित चक्रवर्ती असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून आयएएस अधिकारी डेका यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या व्यक्तीला त्याच्या शहरापासून तब्बल 273 किलोमीटर अंतरावरील कोकराझार येथील कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आला आहे. फेसबुकवर कमेंट करणाऱया व्यक्तीसह इतर दोघांवर सायबर स्टॉकिंग आणि अपमानास्पद लैंगिक टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नरेश बारुआ नावाच्या व्यक्तीने डेका यांच्या पह्टोवर केलेल्या कमेंटला हाहा म्हणजेच हसतानाची इमोजी वापरून चक्रवर्तीने प्रतिक्रिया दिली होती.
नेमके काय घडले?
बारूआ यांनी डेका यांच्या पोस्टवर कमेंट करताना मॅडम, आज मेकअप केला नाही? (नो मेअकप टुडे, मॅम?) अशी कमेंट केली होती. यावर डेका यांनी बारुआच्या कमेंटवर तुम्हाला काय अडचण आहे? असे उत्तरही दिले होते, परंतु कमेंटचा मुद्दा पुढे चांगलाच पेटला आणि डेका यांनी कोकराझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बारुआ आणि तिसरा व्यक्ती अब्दुल सुदूर चौधरी यांच्यावरही चक्रवर्तीने आरोप केले आहेत.