
अर्धवट शिक्षण घेतल्यानंतर काही वर्षांनी पुन्हा नियमित शिक्षण करण्यासाठी विद्यापीठाकडून आकारण्यात येणारा 55 हजारांचा दंड बंद करा, अशी मागणी युवा सेनेने विद्यापीठाकडे केली आहे. दंडाची रक्कम कमी करण्यासाठी विद्यापीठ कर्मचारी विद्यार्थ्यांकडून लाच घेत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. शिवाय विद्यार्थ्यांनाही या अवाढव्य रकमेचा भुर्दंड पडत असल्याचे युवासेनेने विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
अशाच प्रकरणात विद्यापीठाच्या परीक्षा भवन येथील एका महिला कर्मचाऱयाला विद्यार्थ्यांकडून लाच घेताना लाचलुचपत खात्याच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. याबाबत युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी कुलगुरू डॉ. प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांची भेट घेतली. मुंबई विद्यापीठ किंवा संलग्न विद्यापीठात दहा वर्षांपूर्वी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना 55 हजार भरून शिक्षण नियमित करण्याचा नियम करण्यात आल्याचे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी कर्मचाऱयांकडून लाच मागितली जात असल्याचे युवासेनेने निदर्शनास आणून दिले. नियम बनवला असेल तर त्याची व्यापक प्रसिद्धी करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांसाठी या सुविधेसाठी विशेष खिडकी सुरू करण्याची मागणी यावेळी केली.



























































