
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 1-बी मध्ये आज संध्याकाळी अचानक आग लागली. टर्मिनलच्या तळमजल्यावर असलेल्या स्विच बोर्डमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे उघडकीस आले आहे. या आगीमुळे टर्मिनलमध्ये धुराचे लोट पसरले होते. अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. टर्मिनलवरील कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनी या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने ते बचावले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
टर्मिनलच्या तळमजल्यावर केबल ट्रे आणि स्विचबोर्डमध्ये शॉर्टसर्किट झाले. ही आग केवळ तळमजल्यापर्यंतच मर्यादित असल्याने पुढील अनर्थ टळला. अन्यथा टर्मिनलचे मोठे नुकसान झाले असते. सुरुवातीला विमानतळावरील अग्निबंबांच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आगीचे स्वरूप पाहता मुंबई अग्निशमन दलाची अतिरिक्त मदत मागवण्यात आली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तब्बल अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश मिळाल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली आहे.




























































