महाराष्ट्राला मोठा धक्का! फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प यूपीत उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; फडणवीसांचा दावा ठरला पोकळ

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नॅशनल सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत सहाव्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. फॉक्सकॉन आणि एचसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर प्रदेशातील जेवरमध्ये हा सेमीकंडक्टरचा प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच या प्रकल्पासाठी 3 हजार 706 कोटींच्या गुंतवणुकीलाही केंद्र सरकारने हिंरवा कंदील दिला आहे. यामुळे महाराष्ट्रात येणारा फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टरचा प्रकल्प उत्तर प्रदेशात गेल्याने मोठा झटका बसला आहे.

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने विरोधी पक्षांनी राज्यातील महायुती सरकारला धारेवर धरले होते. या प्रकल्पावरून विरोधी पक्षांनी महायुती सरकारची मोठी कोंडी केली होती. त्यावेळी फॉक्सकॉनला महाराष्ट्रात यावंच लागेल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी छातीठोक पणे केला होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दावा पोकळ ठरला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी संवाद साधताना उत्तर प्रदेशातील जेवरमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याची हवाच निघून गेली.

नितीश कुमार यांची ‘इव्हेंटबाजी’, शहीद जवानाच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी रेड कार्पेट; लाखो रुपये केले खर्च

सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात प्रयत्न केले होते. त्यावेळी हिंदुस्थानमधील वेदांता समूहासोबत मिळून फॉक्सकॉन कंपनी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न करत होती. आणि वेदांता-फॉक्सकॉनने महाराष्ट्र, तेलंगण आणि गुजरातमध्ये नवीन प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव पाठवले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रस्ताव आला होता. त्यानंतर महाराष्ट्रात सत्ता बदल होऊन महायुतीचे सरकार येत असताना हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. यानंतर विरोधी पक्षांनी हा विषय उचलून धरल्याने महायुती सरकारवर मोठी टीका झाली होती.

महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी घेतली देशाच्या 52व्या सरन्यायाधीश पदाची शपथ

वेंदाता-फॉक्सकॉनचा प्रकल्प हा गुजरातमध्ये यशस्वीपणे होऊ शकला नाही. कारण फॉक्सकॉन आणि वेदांता समूहामध्ये जो संयुक्त उद्यम होणार होता तो ब्रेक झाला. आणि वेदांता आणि फॉक्सकॉन या दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या झाल्या. त्यानंतर फॉक्सकॉनने आता एचसीएल सोबत प्रकल्प उभारण्याची तयारी केली आहे. या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

काय आहे प्रकल्पाचे वैशिष्ट्य?

> जेवरमध्ये उभारण्यात येणाऱ्या फॉक्सकॉन-एचसीएलच्या सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी 3706 कोटींची गुंतवणूक होणार आहे.

> प्रकल्पातून 2000 नागरिकांना रोजगार मिळेल

> प्रत्येक महिन्याला 3.6 कोटी डिस्प्ले ड्राईवर चिपचे उत्पादन होईल. ( ही चिप मोबाईलच्या डिस्प्लेसाठी आवश्यक असते )