
प्रसिद्ध नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या निधनामुळे मुंबईपासून माडबनपर्यंत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. वयाने थकलेले असूनही गवाणकर यांचा उत्साह कायम होता. त्यांच्यातील नाट्यवेडा सतत जागा होता. या उत्साहातूनच त्यांनी वयाच्या 83 व्या वर्षी गावातील तरुण कलाकारांना घेऊन ‘वस्त्रहरण’चा प्रयोग केला आणि तात्या सरपंचाची भूमिका करून तरुणांनाही लाजवले होते.
‘वस्त्रहरण’च्या माध्यमातून मालवणीचा झेंडा सातासमुद्रापार नेणाऱया गवाणकरांची नाळ गावच्या मातीत घट्ट रुजलेली होती. निवृत्तीनंतर ते आपल्या माडबन गावी राहू लागले. लोक त्यांना प्रेमाने ‘नाना’ म्हणत. गावी असतानाही त्यांचे लिखाण सुरू होते. गावातील कलाकरांसाठी त्यांनी नाट्यलेखन केले. ‘विठ्ठला विठ्ठला’ हे नाटक त्यांनी लिहिले. गावातील कलाकारांना घेऊन त्याचे प्रयोगही केले. 1952 साली माडबनच्या ज्या प्राथमिक शाळेत ते शिकले त्या शाळेच्या शताब्दी महोत्सवात 2023 साली त्यांनी ‘वस्त्रहरण’चा प्रयोग सादर केला.
रत्नागिरीतील कलाकारांचा आधार
रत्नागिरीतील संकल्प कलामंचसोबत त्यांनी ‘महापुरुष पावलो’ आणि ‘नटीचं काय?’ ही दोन नाटपं राज्य नाटय़ स्पर्धेत सादर केली. रत्नागिरीच्या कलाकारांना घेऊन ‘नटीचं काय?’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणायचे त्यांचे स्वप्न होते. रत्नागिरीतील अनेक नाटय़लेखक व कलाकारांसाठी ते मार्गदर्शक होते. अनेक कार्यक्रमांत ते आवर्जून सहभागी होत. वयाच्या 85 व्या वर्षीही नाटक सादर करण्याची त्यांना हौस होती. राजापूरच्या कलाकारांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले.
























































