नीलकमल दुर्घटना प्रकरण; सात वर्षांचा जोहान अद्याप बेपत्ता

नीलकमल या प्रवासी बोटीला अपघात झाल्यापासून जोहान पठाण हा सात वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला. घटना घडून आज तीन दिवस लोटले तरी त्याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. त्याचा शोध घेण्याचे काम आजही सुरू होते.

बुधवारी दुपारी गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटासाठी निघालेल्या नीलकमल या प्रवासी बोटीला उरण येथील समुद्रात अपघात झाला होता. नौदलाची स्पीड बोट धडकल्याने ही दुर्घटना घडली होती. या भीषण अपघातात आतापर्यंत 14 जणांना मृत्यू झाला असून जोहान पठाण या सात वर्षांच्या मुलाचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. जोहान आणि हंसराज भाटी (43) हे दोघे घटना घडल्यापासून बेपत्ता होते. गुरुवारी अपघातग्रस्त बोटीच्या खालच्या बाजूला अडकलेल्या हंसराज यांचा मृतदेह सापडला. मात्र सात वर्षांचा जोहान अजून सापडू शकलेला नाही.

पत्रकबाजी, समितीकडून चौकशी

नीलकमल बोटीची दुर्घटना घडल्यानंतर आता कुलाबा पोलीस आणि नौदलाच्या वतीने त्यांच्या पातळीवर तपास सुरू करण्यात आला आहे. प्रवासी बोटीची क्षमता किती होती. त्या दिवशी किती प्रवाशी बोटीत होते. अपघात घडला तेव्हा प्रवाशांना लाईफ जॅकेट का देण्यात आले नाही याची उत्तरे मिळविण्यासाठी पोलिसांनी मेरिटाईम बोर्ड आदी ठिकाणी पत्रव्यवहार केला आहे. तर नौदलाने या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली असल्याचे सांगण्यात येते.

बोट किनाऱ्याला आणली, पण तपासणी कोणी करेना

नीलकमल बोट गुरुवारी संध्याकाळी शिवडीच्या लकडा बंदर येथे टोव्ह करून आणण्यात आली. पण तिची तपासणी करण्याची जबाबदारी कोणी घेत नसल्याचे चित्र आहे. याच बोटीखाली हंसराज भाटी यांचा मृतदेह सापडला होता. अजून कोणी बोटीखाली अडकून पडले आहे का याचा शोध होणे गरजेचे आहे. परंतु यासाठी सक्षम यंत्रणा पुढाकार घेत नसल्याने त्या बोटीचे संपूर्ण निरीक्षण आज तीन दिवस झाले तरी झाले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

35 जणांना वाचवणाऱ्या आरिफ बामणेंना प्रशस्तिपत्रक देणार

नीलकमल बोट दुर्घटनेतील 35 जणांना वाचवणाऱ्या आरिफ बामणे यांचा राज्य शासनाच्या वतीने प्रशस्तिपत्रक देऊन गौरव केला जाणार आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत याची ग्वाही दिली.

चंद्रकांत पाटील यांनी नीलकमल बोट दुर्घटनेबाबत सभागृहात निवेदन करून सद्यस्थितीबाबत माहिती दिली. त्यावर काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी आरिफ बामणेबाबत माहिती देत त्याला प्रशस्तिपत्रक देण्याची मागणी केली. आरिफ बामणे हा दापोलीचा आहे. तो सरकारी बोटीवर काम करतो. त्याची बोट जवळपास होती. बोट बुडल्याचे पाहताच त्याने आपली बोट तिथे वळवली. त्याच्याकडे लाईफ जॅकेट्स होती. त्याने समुद्रात उडी मारली आणि 35 लोकांना वाचवले. एक लहान मूल बेशुद्ध पडले होते, त्यालाही त्याने तातडीने उपचार करून वाचवले, असे भाई जगताप यांनी सांगितले.

नौदल या प्रकरणी चौकशी करत आहे. त्यामुळे राज्य शासनानेही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी केली.