
सोशल मीडियावर रोज नवनवीन फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता सध्या एका बेबी डायपरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या डायपरची किंमत 50 हजार रुपये आहे. हे डायपर (Gucci) या लक्झरी फॅशन ब्रँडचे आहे. ७ डायपरच्या एका पॅकची किंमत 500 डॉलर्स म्हणजेच हिंदुस्थानी चलनानुसार सुमारे 50 हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे एका डायपरची किंमत साधारण 7 हजार रुपये आहे. ही किंमत एकून नेटकरी हैराण झाले असून या किमतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
व्हायरल पोस्टनुसार, हे डायपर साध्या प्लॅस्टिकचे नसून ते ऑर्गेनिक कॉटन, अँटी-बॅक्टेरिया लेयर आणि सॉफ्ट मेमरी फोमपासून बनवलेले आहेत. इतकेच नाही तर त्यावर Gucci चा प्रसिद्ध ‘GG’ पॅटर्न देखील छापलेला आहे. यावर नेटीझन्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. “इतके महागडे डायपर घातल्यावर मूल रडणे थांबवेल की काय?” असा प्रश्न काहीजण विचारत आहेत, तर काहींच्या मते एका डायपरच्या किमतीत मध्यमवर्गीय कुटुंबाचे महिनाभराचे रेशन आणि वीज बिल सहज भरले जाऊ शकते.
मात्र या व्हायरल फोटोची पडताळणी केली असता, Gucci ने अधिकृतरीत्या असे कोणतेही डायपर लाँच केलेले नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो पूर्णपणे चुकीचा असून तो केवळ एक मीम (Meme) आहे. Gucci ब्रँड लहान मुलांचे कपडे आणि इतर वस्तू विकतो हे खरे असले तरी, 50 हजारांच्या डायपरचा दावा केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इंटरनेटच्या जगात अशा हैराण करणाऱ्या बातम्या वेगाने पसरतात, कारण लोक त्या उत्साहाने शेअर करतात. लक्झरी ब्रँड्स त्यांच्या महागड्या वस्तूंसाठी ओळखले जातात, त्यामुळे लोकांनी या अफवेवर सहज विश्वास ठेवला. मात्र, 50 हजारांच्या डायपरची बातमी ही निव्वळ कल्पनाशक्ती असून, अशा फेक न्यूजपासून सावध राहणे गरजेचे आहे.



























































