चांदोलीत अतिवृष्टी; नद्यांची पातळी वाढली

सांगली जिह्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱया दिवशी अतिवृष्टी नोंदवली गेली. शनिवारी सकाळी आठ ते रविवारी सकाळी आठ या 24 तासांत 75 मि.मी. पाऊस झाला होता. आज सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत पुन्हा 70 मि.मी. पावसाची नोंद झाली.

सांगली जिह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू राहिली. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरू होती. कोयना धरणातून विसर्ग बंद असतानाही नदीची पाणी पातळी वाढते आहे.

शिराळा तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची संततधार कायम सुरू आहे. वारणा धरण परिसरात शनिवारी सकाळी 8 ते रविवारी सकाळी 8 या चोवीस तासांत 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खुंदलापूर-मणदूर दरम्यानच्या मुख्य घाट रस्त्यावर जाधववाडी ते मणदूर दरम्यानच्या घाटात पावसाच्या पाण्यामुळे मुख्य रस्त्याचा काही भाग खचला. त्या रस्त्याची पाहणी मंडल अधिकारी विठ्ठल पाटील यांनी केली.

चांदोली धरणातून सध्या विसर्ग करण्यात येत आहे. विद्युत निर्मिती करून 1592 क्युसेकने पाणी वारणा नदीत सोडले जात आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. एका दिवसात 1.03 टीएमसी म्हणजे 1.2 मीटरने पाणी पातळीत वाढ झाली आहे. 21 दिवसांत 8 वेळा अतिवृष्टी झाली आहे. वारणा नदीवरील मांगले-सावर्डे, कोकरूड-रेठरे, शिराळे खुर्द-माणगाव हे तीन बंधारे पाण्याखाली गेले असल्याने शिराळा व शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील काही गावांचा जवळचा संपर्क तुटला आहे. चरण, सागाव येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी पोट मळीतील नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. आज रविवारी सकाळी 8 वाजता धरणाच्या पाण्याची पातळी 615.85 मीटर, तर पाणीसाठा 695.760 दलघमी होता. धरणात 24.57 टीएमसी म्हणजे 71.42 टक्के पाणीसाठा झाला आहे. विद्युत निर्मितीतून 1595 क्युसेकने विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. संततधार पावसामुळे ओढे, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. धरणात 13 हजार 534 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.

पाथरपुंजला 114 मि.मी. पाऊस

सातारा जिह्यातील पाथरपुंज (ता. पाटण) या भागात आज सकाळी आठ ते सायंकाळी चार या आठ तासांत तब्बल 114 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या भागातील पाणी चांदोली धरणात येते. त्यामुळे धरणातील पाणी पातळी झपाटय़ाने वाढू लागली आहे. धरणातील पाणीसाठा 25 टीएमसीवर पोहोचला आहे.