
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सांगत एका बारला ऑर्केस्ट्राचा परवाना नाकारणाऱया नवी मुंबई पोलिसांना उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. या बारला लाईव्ह ऑर्पेस्ट्राचा परवाना देण्याचे आदेश न्यायालयाने नवी मुंबई पोलिसांना दिले.
हौसा रेस्टॉरंट अॅण्ड बारला वाशी पोलिसांनी लाईव्ह ऑर्केस्ट्राचा परवाना नाकारला. त्याविरोधात बारच्या वतीने याचिका करण्यात आली होती. न्या. एन. जे. जमादार यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. आमच्या परिसरात अन्य बारला ऑर्पेस्ट्राचा परवाना देण्यात आला आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने वरील आदेश देऊन ही याचिका निकाली काढली.
पोलिसांचा दावा
या बारला ऑर्केस्ट्राचा परवाना देऊ नये यासाठी 23 गृहनिर्माण सोसायटय़ा, 234 नागरिक व व्यावसायिक संघटनेने निवेदन दिले. त्यामुळे आम्ही या बारला परवाना नाकारला, असा दावा पोलिसांनी केला. तो न्यायालयाने अमान्य केला.
40 बारला परवाना
नवी मुंबईतील 40 बारला पोलिसांनी ऑर्केस्ट्राचा परवाना दिला आहे. असे असताना याचिकाकर्त्यांना हा परवाना नाकारणे योग्य नाही. याने व्यावसाय करण्याच्या त्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा येते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
बाजू मांडण्याची संधी दिली नाही
परवाना नाकारण्याच्या नवी मुंबई पोलिसांच्या निर्णयावर कोकण विभागीय आयुक्तांनी शिक्कामोर्तब केले. पोलिसांना असा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. आयुक्तांनी बारचे म्हणणे न ऐकताच हा निकाल दिला. नैसर्गिक न्यायदान पद्धतीने हा निकाल दिला गेला नाही, असे न्या. जमादार यांनी नमूद केले.




























































