
लैंगिक अत्याचाराच्या घटनेने आज डोंबिवली हादरली. एका 22 वर्षीय तरुणीवर दोघा रिक्षाचालकांसह आरटीओ एजंटने गँगरेप केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरटीओ एजंट उमेश वर्मा (40), रिक्षाचालक चेतन चव्हाण (20) आणि हेमंत चव्हाण (22) या नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण न्यायालयाने तिन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित महिला ही कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथे राहणारी असून ती डोंबिवलीतील एका सुरक्षारक्षक एजन्सीमध्ये कामाला आहे. तिची ओळख काही रिक्षाचालकांशी होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपींनी 26 मार्चच्या रात्री तिला पार्टीच्या बहाण्याने खंबाळपाडा येथे एका फ्लॅटवर बोलावले. पार्टीत उमेश वर्मा, चेतन चव्हाण आणि हेमंत चव्हाण यांनी पीडितेला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर अत्याचार केला. या धक्कादायक घटनेनंतर पीडितेने टिळकनगर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, धनंजय गुणगे आणि शिवाजी बुनगे यांनी कसोशीने तपास करत अवघ्या काही तासांतच तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. कल्याण न्यायालयात या आरोपींना हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
चिमुकलीचा विनयभंग
पाच वर्षांच्या चिमुकलीचा हरेश भावे (46) या पुजाऱयाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना काटेमानिवली परिसरात घडली. बुधवारी चिमुकली घरी एकटी असताना आरोपीने घरात प्रवेश करून तिच्याशी अश्लील चाळे केले. चिमुकलीने आईला हा प्रकार सांगितल्यानंतर आईने तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी हरेश भावे याला अटक केली.




























































