मानव आणि वन्य जीव संघर्षात वाढ, वाघांची नसबंदी करण्याची गरज- नितीन गडकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विदर्भात वाघांची वाढती संख्या आता गरजेपेक्षा जास्त आहे. वाघ आता गावांमध्ये यायला लागल्याने लोकांचा जीव धोक्यात आला आहे. गावापर्यंत वाघ यायला लागल्याने मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढत चालला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वाघांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नसबंदीसारख्या उपायावर विचार करण्याची गरज आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित तिसऱया ऍडव्हांटेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोपीय सत्रात बोलताना नितीन गडकरी यांनी वाढत्या वाघांच्या संख्येवर चिंता व्यक्त करतानाच नसबंदीविषयी भाष्य केले. वाघ पाहण्यासाठी संपूर्ण जगभरातून पर्यटक मोठय़ा संख्येने विदर्भात येत आहेत. पण आता वाढती वाघांची संख्या ही एक समस्या झाली आहे, असे सांगत वाघांच्या नसबंदीचा मुद्दा गडकरी यांनी अधोरेखित
केला.

चंद्रपूर आणि परिसरात वाघ-मानव संघर्ष वाढला आहे. वाघांनी हल्ला केल्याच्या घटना दररोज घडत आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभागाने पावले उचलावीत आणि हा संघर्ष थांबवावा, अशी मागणी स्थानिकांकडून सातत्याने करण्यात येते आहे.

वाघांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी गर्भनिरोधकांचा उपयोग करण्याची शिफारस मागील वर्षी करण्यात आली होती. त्याला मोठा विरोध झाल्यानंतर तो विषय वर्षभर मागे पडला होता.

3 जानेवारी रोजी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीच्या टिप्पणीत या मुद्याचा पुन्हा उल्लेख आल्याने नव्या चर्चेला प्रारंभ झाला आहे. वाघांची नसबंदी करण्याचे प्रयत्न वन विभागाने पुन्हा सुरू केले आहेत का, असे सवाल वन्यजीवप्रेमींकडून विचारले जात आहेत.