
देशभरात दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांची बाजार पेठांमध्ये झुंबड उडत आहे. अशातच हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानात मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दुकानाच्या शेजारी असणारे रेस्टॉरंट जळून खाक झाले असून एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.
सदर घटना हैदराबादच्या सुलतान बाजार परिसरात घडली आहे. 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या सुमारास फटाके खरेदी करण्यासाठी दुकानात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याच दरम्यान अचानक दुकानात फटाक्यांचा स्फोट झाला आणि मोठी आग लागली. यावेळी दुकानात नागरिकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे आग लागताच लोकांनी दुकाना बाहेर पडण्यासाठी धावपळ सुरू केली. त्यामुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थितीन निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि 10.30 च्या दरम्यान आग आटोक्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
View this post on Instagram
पोलीस अधिकारी के शंकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, दुकाना शेजारी असणारे रेस्टॉरंट जळून खाक झाले आहे. तसेच 7 ते 8 गाड्या जळाल्या असून एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. फटाक्यांच्या दुकानाचे नाव पारस असून त्यांच्याकडे फटाके विकण्याचा परवाना नाही. त्यामुळे दुकानावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे के शंकर यांनी सांगितले.