
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) वादग्रस्त भागात पुन्हा गस्त सुरू करण्यास हिंदुस्थान आणि चीनने करार केला आहे. यामुळे सीमेवरील चार वर्षांचा दोन्ही देशातील सैन्य विरोध संपला आहे. हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या कराराबाबत सोमवारी माहिती दिली. दोन्ही देशातील या कराराला चीननेही मंगळवारी दुजोरा दिला आहे.
गेल्या काही काळापासून हिंदुस्थान आणि चीन सीमेबाबत राजनैतिक आणि लष्करी पातळीवर सातत्याने चर्चा करत आहेत. आता या विषयावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली असून आम्ही यावर हिंदुस्थानसोबत काम करू, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले म्हटले आहे.
आता हिंदुस्थानचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) 2020 च्या परिस्थितीवर परतल्यानंतर हिंदुस्थान सीमेवरील तणाव दूर करण्यावर आणि सैन्य माघारीवर विचार करेल, असे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले. जे बफर झोन तयार करण्यात आले आहेत त्यावर अतिक्रमण झालेले आहे का? हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी पुढे म्हणाले.
आम्हाला एप्रिल 2020 च्या यथास्थितीकडे परत जायचे आहे. त्यामुळे 2020 च्या यथास्थितीवर परतल्यानंतर आम्ही सैन्य माघारी घेण्यावर विचार करू. आम्ही भेटून पुन्हा एकमेकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. जे बफर झोन तयार करण्यात आले आहेत, त्यात अजून काही रेंगाळलेले नाही ना? हे पाहावे लागेल. गस्त सुरू झाल्यावर एकमेकांमध्ये विश्वास निर्माण करण्यावर आमचा भर असेल, असे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्पष्ट केले.
मे 2020 पासून चीनने लडाखमधील सुमारे 1000 चौरस किमी हिंदुस्थानच्या भूभागावर कब्जा केल्याचा आरोप हिंदुस्थानने केला आहे. गलवानमध्ये 2020 जून 15-16 ला हिंदुस्थान आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात एका कमांडरसह हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले होते. यामुळे सीमेवर दोन्ही देशात तणाव वाढला होता.