
ऑपरेशन सिंदूर नंतर हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हिंदुस्थानने दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. दहशतवाद पोसत असल्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानवर दबाव वाढत आहे. हा दहशतवाद संपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकजूट करण्याचे आवाहन केले जात आहे. याचपार्श्वभूमीवर इस्रायलमधील हिंदुस्थानचे राजदूत जेपी सिंह यांनी महत्त्वाचे भाष्य करत पाकड्यांना चांगलेच सुनावले आहे.
इस्रायलमधील हिंदुस्थानचे राजदूत जेपी सिंह यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानमधील दहशतवाद आणि वाढचा तणाव याबाबत भाष्य केलं. पाकिस्तानविरुद्ध हिंदुस्थाचे ऑपरेशन सिंदूर ‘थांबले’ आहे मात्र संपलेले नाही असे ते म्हणाले. ज्याप्रमाणे अमेरिकेने 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसेन राणाला हिंदुस्थानच्या ताब्यात दिले. त्याचप्रमाणे हाफिज सईद, साजिद मीर आणि झाकीर उर रहमान लख्वीसारख्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आमच्या स्वाधीन करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
ऑपरेशन सिंदूर ही मोहिम पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात होती. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी लोकांना त्यांच्या धर्माच्या आधारे मारले. त्यांनी लोकांना मारण्यापूर्वी त्यांच्या धर्माबद्दल विचारले आणि 26 निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला. त्यामुळे हिंदुस्थानने कठोर कारवाई केली. ही कारवाई दहशतवाद्यांविरोधात होती. मात्र पाकिस्तानने हिंदुस्थानच्या लष्करी भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी हिंदुस्थानने त्यांना चांगलेच प्रत्युत्तर देऊन अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, असे ते म्हणाले.
हिंदुस्थान पाकिस्तानातील तणावानंतर दोन्ही देशाच्या संमतीने युद्धविराम जाहीर झाला आहे. परंतु आम्ही स्पष्ट केले आहे की ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यात आले आहे, ते अजून संपलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.