
मुंबईत विविध प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. प्रकल्पग्रस्त वसाहती किती, कुठल्या विभागात, प्रकल्पात किती बाधित, किती घरे उपलब्ध करणे, प्रकल्पग्रस्तांची घरे कुठल्या विभागाला दिली याची माहिती एकत्रित उपलब्ध केली जाणार असून त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना घरांचे वितरण करणे सोपे होणार आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आणि महापालिकेची चिंता मिटणार आहे.
मुंबई महापालिका मुंबईकरांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रकल्प राबवते. काही वेळा हे प्रकल्प राबवताना तेथील लोकांचे स्थलांतर करावे लागते. अशावेळी पर्यायी घरे लगेच उपलब्ध होत नसल्यामुळे पालिकेला प्रकल्पबाधितांना जागे अभावी पर्यायी घरे देणे अडचणीचे ठरते. त्यामुळे प्रकल्पबाधित आणि मुंबई महापालिकेत वाद होत असतात. यावर तोडगा काढण्यासाठी प्रकल्पग्रस्तांची सर्व प्रकारची माहिती गोळा केली जात आहे. मुंबईत नाला रुंदीकरण, रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल बांधणे, जलवाहिन्या बदलणे, भाजी मार्केटचा पुनर्विकास असे विविध प्रकल्प पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येतात. मुंबई महापालिकेसह विविध प्राधिकरणांची पाच हजारांहून अधिक प्रकल्पाची कामे सुरू आहेत. या प्रकल्पात घरे, व्यावसायिक गाळे आड येत असल्याने त्यांना पर्यायी जागा देणे कायद्याने बंधनकारक आहे. या आधी घराच्या बदल्यात प्रकल्पग्रस्त म्हणून घर दिले जात होते. मात्र, घरे उपलब्ध होत नसल्याने आता आर्थिक मोबदला दिला जात आहे.
घरांऐवजी आर्थिक मोबदल्याचा पर्याय
झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यानुसार घर कितीही मोठे असले तरी 300 चौरस फुटांचीच घरे दिली जातात. त्यामुळे घराच्या बदल्यात मोबदला म्हणून पालिकेच्यावतीने 25 ते 40 लाख देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याना पैशांऐवजी घरे हवी असल्यास मुंबईच्या कोणत्याही भागात उपलब्ध असलेल्या ठिकाणी ती देण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. मात्र, राहत असलेल्या ठिकाणापासून दुस-या ठिकाणी घरे मिळत असल्याने काही रहिवासी पैशांचा पर्याय स्वीकारतात.
40 हजार घरांची आवश्यकता
सध्या 40 हजार प्रकल्प बाधितांना घरांची गरज आहे. एसआरएकडून 19 हजार प्रकल्पग्रस्तांना देण्यासाठी घरे मिळाली असून 16 हजार घरे माहुल येथे आहेत. माहुलमधील 16 हजारांपैकी पाच ते सहा हजार प्रकल्प बाधितांनी घरे स्वीकारली आहेत तर प्रदूषणामुळे अन्य बाधित माहुलमधील घरांचा पर्याय स्वीकारत नसल्याने दोन हजार बाधितांचे पुनर्वसन एचडीआयएल कॉलनीत केले आहे.