
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा भडका वाढत चालला आहे. अमेरिकेने आत्तापर्यत केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचे प्रचंड नुकसान झाल्याचा दावा केला आहे.अमेरिका आणि इस्रायलने इराणची सैन्यशक्ती खिळखिळी केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे समोर आले आहे. एका गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण हल्ल्यांनंतरही इराणची ताकद पूर्णपणे संपलेली नाही. अमेरिकन प्रशासनाची विधाने आणि जमिनीवरील वास्तव यामध्ये मोठी तफावत असल्याचे सीएनएनच्या (CNN) अहवालात म्हटले आहे.
गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, इराणकडे अद्यापही निम्मी क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता आणि हजारो ड्रोन्स सुरक्षित आहेत. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी त्यांचे 50 टक्के लाँचर्स आणि कोस्टल क्रूझ मिसाईल्स अजूनही सक्रिय आहेत. प्रामुख्याने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ या सागरी मार्गावरील जहाजांसाठी ही शस्त्रे आजही मोठा धोका ठरू शकतात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धादरम्यान अनेक दावे केले आहेत. इराणचे शस्त्र कारखाने आणि लाँचर्स पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, गुप्तचर अहवाल या दाव्याला दुजोरा देत नाही. इराणची ‘अंडरग्राउंड टनल सिस्टीम’ आणि ‘मोबाईल लॉन्च प्लॅटफॉर्म’मुळे त्यांचे लष्करी सामर्थ्य टिकून आहे. पेंटागनने इराणचे हल्ले 90 टक्क्यांनी कमी झाल्याचे म्हटले असले, तरी इराणची पलटवार करण्याची क्षमता अद्याप संपलेली नाही.
इराणने आपली क्षेपणास्त्रे आणि लाँचर्स जमिनीखालील बोगद्यांमध्ये आणि गुहांमध्ये अत्यंत सुरक्षितरीत्या लपवून ठेवले आहेत. यामुळे अमेरिका आणि इस्रायलला त्यांना अचूक लक्ष्य करणे कठीण जात आहे. अमेरिकेने या बोगद्यांची प्रवेशद्वारे आणि अवजड यंत्रसामग्री नष्ट करण्याचा प्रयत्न केला असला, तरी इराणच्या कोस्टल क्रूझ मिसाईल्सचा धोका अजूनही टळलेला नाही. इराणची ही ‘मोबाईल सिस्टीम’ त्यांच्या संरक्षणासाठी मोठी ढाल ठरत आहे.
इराणच्या नौदलाचे नुकसान झाले असले, तरी ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’च्या (IRGC) लहान नौका आणि जहाजे अद्याप सक्रिय आहेत. यांचा वापर करून इराण आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारावर परिणाम करू शकतो. तज्ज्ञांच्या मते, इराणला लष्करीदृष्ट्या पूर्णपणे संपवणे इतक्यात तरी शक्य नाही. अमेरिका आणि इस्रायलसाठी इराणची ही उर्वरित सैन्यशक्ती आगामी काळात मोठे आव्हान ठरू शकते.एबीपी न्युजने याबाबत वृत्त दिले आहे.




























































