
जळगावमध्ये अत्यंत संतापजनक घटना घडली. सहा वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी आधीच आरोपीला सुरक्षित ठिकाणी नेल्याचे कळताच नागरिकांनी जामनेर पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात 10 ते 12 पोलीस जखमी झाले आहेत.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना गुरुवारी रात्री 10.15 च्या सुमारास घडली आहे. जामनेर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वीच एका सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली होती. या माहितीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. मात्र गुरूवारी रात्री काही लोकांच्या गटाने जामनेर पोलीस ठाण्यात गोंधळ घालत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. यावेळी कोणीही कायदा हातात घेऊ नका असे आवाहन पोलिसांनी केले होते. मात्र तरीही जमावाने ठाण्यावर दगडफेक केली.
या घटनेत पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जखमी पोलिसांना जळगावमधील खासगी आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सध्या तेथील परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. तसेच ज्या लोकांनी कायदा सुव्यवस्थेची पर्वा न करता पोलिसांवर दगडफेक केली, तोडफोड केली. त्या सगळ्यांवर सीसीटीव्ही फुटेज तपासून योग्य ती कारवाई केली जाईल, असे जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सांगितले आहे.