
सोमय्या विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या तीन महाविद्यालयांमधील 11 वीच्या अॅडमिशन झोलप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. पंडित रमेश कराणके असे त्याचे नाव असून तो घाटकोपर येथील हिंदी हायस्कूलमधील कनिष्ठ लिपिक आहे. पंडितच्या अटकेमुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे.
विद्याविहार येथील सोमय्या विद्यापीठा अंतर्गत येणाऱया तीन महाविद्यालयांमध्ये वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता अकरावीसाठी काही विद्यार्थ्यांचे बनावट गुणपत्रिका व शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या आधारे अॅडमिशन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशन पवार यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात लिपिक महेंद्र पाटील, अर्जुन राठोड, कमलेशभाई, जितूभाई, बाबूभाई यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर प्रभारी निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बाचेवाड, उपनिरीक्षक आत्माराम राठोड व पथकाने केलेल्या चौकशीत अॅडमिशनचा झोल झाल्याचे निष्पन्न होताच गुन्हा दाखल करून सोमय्या महाविद्यालयामध्ये लिपिकाचे काम करणारे महेंद्र पाटील, अर्जुन राठोड तसेच खासगी डीटीपी ऑपरेटरचे काम करणारा देवेंद्र सादये अशा तिघांना अटक केली होती. या तिघांच्या चौकशीत पंडित कराणके याचा सहभाग समोर येताच त्यालाही अटक केली. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कराणके याने 17 विद्यार्थ्यांची गुणपत्रिका व शाळा सोडल्याच्या दाखल्याची पडताळणी केली होती. या मोबदल्यात प्रत्येक विद्यार्थ्यामागे दहा हजार रुपये मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.