Kalyan Accident – कल्याणमध्ये भरधाव ट्रकने रिक्षाला चिरडले, ट्रक नदीत कोसळला

कल्याणमध्ये मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. कल्याणच्या गांधारी पुलावर भरधाव ट्रकने एका रिक्षाला चिरडले. ट्रकचा वेग प्रचंड असल्यामुळे रिक्षाला धडक दिल्यानंतर पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीत कोसळला. या अपघातात रिक्षामधील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात ट्रक चालक सुखरूप असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश वानखेडे असे त्या रिक्षा चालकाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास निलेश त्याच्या आईसोबत रिक्षातून बापगावहून कल्याणकडे निघाले होते. यादरम्यान गांधारी पुलाजवळ एका भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिली. हा अपघात इतका जबरदस्त होता की यामध्ये रिक्षाचा चुराडा झाला. यादरम्यान ट्रकने रिक्षाला धडक दिल्यानंतर पुलाचा कठडा तोडून थेट उल्हास नदीत कोसळला.

अपघाताची माहिती मिळताच कल्याण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन बचावकार्य सुरू केले. या अपघातात निलेश यांच्या आई मंगल वानखेडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर निलेश वानखेडे गंभीर जखमी झाले आहेत.यावेळी तेथील परिस्थिती अत्यंत धक्कादायक होती. रिक्षा चालक निलेश आपल्या आईला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करत होता. दादा, माझ्या आईला उठवा ओ, असे तो तेथील उपस्थित नागरिकांना सांगण्याचा प्रयत्न करत होता. मिळालेल्या माहितीनुसार ट्रकचा चालक सुखरूप असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.