गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमानी गावी निघाले आहेत. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाकडून ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या आहे. त्यामुळे रोज कोकणात जाणाऱ्या गाड्या सुटत असून प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच विघ्नहर्त्याच्या आगमनासाठी कोकणात निघालेल्या दोन बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात कशेडी घाटात झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.
गणोशोत्स्वासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्यामुळे चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या दोन बसचा कशेडी घाटात अपघात झाला आहे. कशेडी बोगद्यात बाईकला वाचवण्यासाठी कंटेनरनं अचानक ब्रेक मारला. त्यामुळे मागून येणाऱ्या दोन बस एकमेकांवर आदळ्यामुळे हा अपघात झाला. यावेळी बसमध्ये सुमारे 80 प्रवाशी होते. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. सगळे प्रवासी सुखरुप असल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी अपघाताची माहिची घेतली. तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून रवाना करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची सख्या वाढल्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव ते लोनेरे या दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.