
कोलकाता येथील प्रसिद्ध पार्क स्ट्रीट परिसरातील एका पबमध्ये मटण स्टिक ऐवजी बीफ दिल्याचा आरोप एका बंगाली अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने केला आहे. सायक चक्रवर्ती असे या अभिनेत्याचे नाव आहे. शनिवारी मिळालेल्या या तक्रारीनंतर पार्क स्ट्रीट पोलिसांनी संबंधित हॉटेलच्या वेटरला अटक केली आहे. सायक आपल्या मित्रांसोबत शुक्रवारी रात्री जेवण्यासाठी प्रसिद्ध ‘ओली’ पबमध्ये गेला होता, जिथे ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
सायक चक्रवर्तीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी जेवणात मटण स्टिकची ऑर्डर दिली होती. मात्र, त्यांना मटणऐवजी गोमांस वाढण्यात आले, जे त्यांनी नकळतपणे खाल्ले. ही बाब तेव्हा लक्षात आली जेव्हा त्यांनी फक्त एक स्टिक मागवला असताना त्यांच्या टेबलवर दुसरा स्टिक आणून ठेवण्यात आला. सायकने जेव्हा याबद्दल वेटरला विचारले, तेव्हा त्याने एक मटण आणि एक बीफ स्टिकची ऑर्डर असल्याचे सांगितले. यामुळे सायकला धक्का बसला.
या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडिओ सायकने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तो हॉटेलचा वेटर आणि मॅनेजरला जाब विचारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये हॉटेल व्यवस्थापनाने आपली चूक मान्य करत माफी मागितली असून, मॅनेजरने ही घटा गंभीर असल्याचे स्पष्ट केले आहे. सायकने आपण ब्राह्मण असल्याचे सांगत आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेख नसरुद्दीन नावाच्या वेटरला कलम 299 अंतर्गत अटक केली आहे.























































