
कुर्ला येथे बेदरकारपणे बस चालवल्यामुळे झालेल्या अपघातात 9 जणांचा बळी गेल्याची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली असून आज अपघातग्रस्त बेस्ट मार्गावरील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवला. पालिकेने केलेल्या कारवाईत 25 दुकानांसमोरील फुटपाथवर थाटण्यात आलेली बेकायदा दुकाने, भलेमोठी छप्परे, लाद्या, अनधिकृत शेड हटवण्यात आले.
कुर्ला येथील एलबीएस मार्गावर 9 डिसेंबरच्या रात्री भरधाव बसने रस्त्यामधील अनेक वाहने आणि 50 हून जास्त पादचाऱ्यांना चिरडले. या भीषण अपघातात 9 जणांना जीव गमावावा लागला आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात असलेले फेरीवाले, बेकायदा दुकानांमुळे गर्दीही होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेने या मार्गावरील बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अतिक्रमांसह दुकानाबाहेर बेकायदेशीरपणे लटकवलेले साहित्य, बाकडीही हटवण्यात आली. या भागात बेकायदा बांधकामांवर, अनधिकृत फेरीवाले आणि शेडवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे ‘एल’ विभाग कुर्ला वॉर्ड ऑफिसकडून सांगण्यात आले.