
औराद शहाजानी येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आणि वाहनचालकाच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडीयावर टाकून येथील एका २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दिनांक २५ रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी संबंधित दोषी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यावर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाइकांसह हजारो नागरीकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नातेवाइकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या केला होता.
औराद शहाजानी येथील इमरान खलीलमिया बेलुरे (वय २२) हा सन २०२२ मध्ये येथील व्यापाऱ्याच्या दुकानात मुनीम होता. त्यांच्याच घरी चोरी झाल्याच्या गुन्ह्यात आरोपी असल्याने त्याला अटक झाली होती. त्यानंतर या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त व तपास पूर्ण करण्यात आला होता. पण मागच्या एक दीड वर्षापासून येथील पोलीस ठाण्याचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे व वाहन चालक तानाजी टेळे हे जेव्हाही रात्र गस्तीवर असताना या इमरान बेलुरे याच्या घरी जात असे व तो झोपीत असतानाही उठवून सेल्फी फोटो काढायचे. तसेच त्याच्या आई, वडिलांना काहीही अपशब्द बोलायचे. त्यामुळे या त्रासाला इमरान बेलुरे कंटाळला होता. पोलीस अधिकारी व कर्मचारी वारंवार मध्यरात्री दारावर लाथ मारायचे, अर्वाच्च बोलायचे, कुठे गेला मुलगा अशी विचारणा करायचे. दमदाटी करून वारंवार मानसिक छळ करीत होते. त्यामुळे अखेर त्याने तेरणा नदीपात्रालगत असलेल्या झाडांमध्ये संध्याकाळी अंदाजे ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या घटनेचा स्वतःचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर टाकून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे गावातील लोकांमध्ये तीव्र संताप पसरला होता. अखेर संबंधित पोलीस अधिकारी व वाहन चालक यांच्यावर गुन्हा दाखल करेपर्यंत शवविच्छेदन करणार नाही, असा पवित्रा घेतला होता. व रात्री १२ वाजेपर्यंत ठिय्या मांडत गुन्हे दाखल करण्याची मागणी करत होते.
या पार्श्वभूमीवर अखेर लातूर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशावरून औराद शहाजानी येथे उदगीर, औसा पोलीसांच्या तुकड्या पचारण करण्यात आल्या. त्यामुळे शांततापूर्ण व तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते. अखेर पोलीस उपअधीक्षक कुमार चौधरी म्हणाले, या प्रकरणामध्ये प्रथम आकस्मिक गुन्हा नोंद केला जाईल. त्यानंतर नातेवाइकांनी दिलेल्या जवाबानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. असे सूचना करत मृत मुलाच्या वडिलांची फिर्याद दाखल करून घेतली आणि रात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास मृतदेह झाडावरून खाली काढून व पंचनामा करून पुढील शवविच्छेदन कार्यवाही करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला.
आमच्या मुलाच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या संबंधित पोलीस अधीकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि दफनविधीही करणार नसल्याचा पवित्रा नातेवाईक आणि गावकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे आज शवविच्छेदन झाल्यावर पोलीस प्रशासनाची काय भूमिका असणार याकडे लक्ष लागले आहे.

























































