सस्पेन्स संपला! 26 जूनला होणार नव्या लोकसभा अध्यक्षांची निवड

नव्या सरकारचं आणि 18 व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन हे येत्या 24 जूनपासून सुरू होत आहे. केंद्रात भाजपप्रणित एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वांचे लक्ष हे लोकसभा अध्यक्ष कोणा होणार? याकडे लागले आहे. आता हा सस्पेन्स संपला असून येत्या 26 जूनला लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहांना 27 जूनला राष्ट्रवादी संबोधित करतील. राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल. नवनिवार्चित खासदारांची शपथ घेऊन झाल्यानंतर नव्या लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाईल. पण त्यापूर्वी 24 आणि 25 जूनला प्रभारी अध्यक्ष नव्या खासदारांना शपथ देतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर लोकसभेच्या नव्या अध्यक्षांच्या नावावर विचार करतील. आधी पक्ष स्तरावर भाजप लोकसभेच्या भावी अध्यक्षाचे नाव निश्चित करेल. त्यानंतर मित्रपक्षांसोबत चर्चा केली जाईल. मित्रपक्षांकडून सूचना किंवा मागणी करण्यात आल्यास भाजप नव्या फॉर्म्युल्यावर विचार करेल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

सर्वसंमतीने लोकसभा अध्यक्षांची निवड व्हावी, यासाठी भाजपकडून विरोधी पक्षांशीही संपर्क केला जाईल. सरकारचा प्रस्ताव विरोधी पक्षांनी स्वीकारल्यास निवडणुकीची वेळ येणार नाही. पण विरोधी पक्षांनी आपला उमेदवार उभा केल्यास 26 जूनला लोकसभेत नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी मतदानही होऊ शकते. संसदेच्या अधिवेशनात लोकसभेचं कामकाज हे 24 जून ते 3 जुलैपर्यंत चालेल. तर राज्यसभेचं कामकाज हे 27 जून ते 3 जुलैपर्यंत चालेल, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजीजू यांनी दिली आहे.