
आगामी महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. एकूण मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून निवडणुकांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी 1 जुलै 2025 पर्यंत नावे नोंदविलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यादृष्टीने तयारी करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेत. आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी वाघमारे बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह आयोगाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत संजय राऊत यांचं मोठं विधान
काय म्हणाले राज्य निवडणूक आयुक्त?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जात नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादी वापरली जाते. 1 जुलै 2025 पर्यंत नावे नोंदविलेली यादी उपलब्धतेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाशी प्राथमिक चर्चा झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्य पद्धतीने घेण्यात येतात. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढेल. मतदान केंद्र निश्चितीबाबत राज्य निवडणूक आयोगाने स्वतंत्र आदेशाद्वारे निकष निश्चित केले आहेत, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले. पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.
नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाई यांना विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की
मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी तातडीने हाती घेण्यात यावी आणि ती निवडणुकांसाठी सज्ज करण्यात यावी. त्याचबरोबर मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळीच करण्यात याव्यात. मतदान केंद्राची जागा निश्चिती, मतदान केंद्र इमारतींची स्थिती, तेथील सर्व सोयीसुविधांबाबत आतापासूनच तयारी करावी, तसेच मनुष्यबळाची उपलब्धता किंवा कमतरतेबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. गरजेनुसार वेळीच मनुष्यबळ उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित विभागीय आयुक्तांशी समन्वय साधावा, असे निर्देश यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेत.