
मणिपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुराचांदपूर जिल्ह्यात 38 वर्षीय मैतेई समाजाच्या व्यक्तीचे अज्ञात हल्लेखोरांनी अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पीडित व्यक्ती मृत्यूच्या काही क्षण आधी हल्लेखोरांकडे जीव वाचवण्यासाठी गयावया करताना दिसत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी उघडकीस आली. चुराचांदपूरचे पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला या गुन्ह्याची माहिती मिळाली. या व्हिडिओमध्ये पीडित व्यक्ती अंधारात एका कच्च्या रस्त्यावर बसलेली दिसत होती. आणि ती हात जोडून दोन व्यक्तींकडे जीव वाचवण्यासाठी विनंती करत आहे. मात्र, त्याच्याकडे दुर्लक्ष करत एका हल्लेखोराने अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयंगलांबम ऋषिकांत (38) अशी मृत व्यक्ती ओळख पटवली असून तो काकचिंग जिल्ह्यातील रहिवासी होता. ऋषिकांतने एका कुकी महिलेशी विवाह केला होता आणि त्याने ‘गिनमिन्थांग’ हे आदिवासी नाव धारण केले होते. तो नेपाळमध्ये नोकरीला होता आणि सुट्टीवर आपल्या पत्नीला भेटण्यासाठी चुराचांदपूर येथे आला होता. बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास त्याचे अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मैतेई संघटनांनी असा दावा केला आहे की, ऋषिकांतसोबत त्याच्या कुकी समाजातील पत्नीचेही अपहरण करण्यात आले होते. ऋषिकांत नेपाळवरून सुट्टीवर येणार असल्याने त्याच्या पत्नीने कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन (KNO) आणि तुईबुओंग भागातील स्थानिक प्रशासनाकडून त्याच्या भेटीसाठी पूर्वपरवानगी घेतली होती, असा दावाही या संघटनांनी केला आहे. असे असूनही त्याचे अपहरण आणि हत्या झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.




























































