
> पराग खोत
विजय केंकरे दिग्दर्शित नाटक ‘मास्टर माईंड’ ही अशीच एक मानसिक रानभूल आहे. ज्या बिंदूपासून हा खेळ सुरू होतो, तो वेगवेगळी अनवट, अपरिचित वळणं घेत पुन्हा त्याच बिंदूकडे येऊन संपतो आणि असं एकदा नव्हे तर अनेकदा होतं. मानवी स्वभावाच्या आणि परस्पर नातेसंबंधाच्या व्यामिश्रतेचा (Complexity) अर्क म्हणजेच ‘मास्टर माईंड.’
रानभूल म्हणजे काय? एखाद्या जंगलात तुम्ही वाट चुकलाय. तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाहीये. अचानक समोर एक पायवाट दिसते आणि तुम्हाला हायसं वाटतं. तुम्ही लगबगीने आणि काहीशा धाकधुकीत त्या वाटेवरून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत पुढे जाता. बरेच अंतर चालून गेल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की तुम्ही जिथून निघाला होतात, तिथेच पुन्हा परत आलाय. तुमची धडधड वाढलीय. इथून बाहेर पडण्याची इच्छा प्रबळ होत चाललीय. पुन्हा एक दुसरी पायवाट दिसते. तुम्ही जिवाच्या आकांताने पुन्हा त्या वाटेवरून निघता… आणि पुन्हा जिथून निघालाय तिथेच परत येता. हीच ती रानभूल! विजय केंकरे दिग्दर्शित नाटक ‘मास्टर माईंड’ ही अशीच एक मानसिक रानभूल आहे. ज्या बिंदूपासून हा खेळ सुरू होतो, तो वेगवेगळी अनवट, अपरिचित वळणं घेत पुन्हा त्याच बिंदूकडे येऊन संपतो आणि असं एकदा नव्हे तर अनेकदा होतं. मानवी स्वभावाच्या आणि परस्पर नातेसंबंधाच्या व्यामिश्रतेचा (Complexity) अर्क म्हणजेच ‘मास्टर माईंड.’
अचानकपणे एका मॉलमध्ये भेटलेले दोन अनोळखी स्त्राr-पुरुष, ऋषभ आणि रश्मी, एका निर्जनस्थळी असलेल्या पडक्या बंगल्यात आले आहेत. ऋषभ त्याच्या घरी रश्मीला घेऊन आलाय. सुरुवातीच्या जुजबी बोलण्यातून दोघांची सध्याची परिस्थिती आणि तिथे येण्यामागची कारणं ह्याविषयी माहिती मिळते. इथे प्रेक्षकांशी कनेक्ट निर्माण होतो आणि प्रेक्षक नाटकाला सरावतो. पण ही नंतर येऊ घातलेल्या वादळापूर्वीची शांतता होती याची जाणीव त्याला व्हायला सुरुवात होते. त्या दोघांत संवाद सुरू होतो. त्याचं पूर्वायुष्य वादळी आहे आणि ती आयुष्यात उत्तम स्थिरावलीय. एकमेकांशी कुठलाही पूर्वसंबंध नसलेली ती दोघं आपापल्या गोष्टी छान शेअर करतायत. ऋषभ तिला ड्रिंक ऑफर करतो. तीसुद्धा निसंकोचपणे त्याला सोबत करत त्या गप्पांत रमलीय. तो रश्मीच्या सौंदर्याची तारीफ करतो, ती त्याच्या दुःखावर सहानुभूतीची फुंकर घालते. हा छान सुसंवाद सुरू असताना मध्येच एका क्षणापुरते त्यांच्यातले नर-मादी डोकं वर काढतात आणि त्यांच्या सूचक संवादांतून आवश्यक ती वातावरण निर्मिती करत पुन्हा निद्रिस्त होतात. हे सर्व आलबेल सुरू असताना ती आता परत घरी जायला निघणार, इतक्यात…
रहस्यमय नाटकांची एक गंमत असते. प्रेक्षक पहिल्या प्रवेशापासूनच ते रहस्य शोधण्याचा प्रयत्न करायला लागतो. मनाशी काही आडाखे बांधत, वेगवेगळ्या पात्रांवर संशय घेत तो तर्काशी झटापट करत असतो. इथे तर नायक आणि नायिका अशी अवघी दोनच पात्रे असल्यामुळे त्यात सुष्ट कोण आणि दुष्ट कोण ह्याचा अंदाज बांधणं अधिक सोपं होऊन जातं. पण लेखकाने ह्यात एक तिसरं पात्र निर्माण केलंय आणि ते म्हणजे परिस्थिती. त्या दोघांच्या क्वचित विचित्र वागण्याला तर्काचं बळ देण्यामध्ये परिस्थिती मोठी भूमिका बजावते. प्रेक्षकांनी हे तिसरं पात्र लक्षात न घेतल्यामुळे त्यांना काही ठिकाणी धक्का बसतो. तसंच माणसांच्या मनातल्या ग्रे शेड्सचा प्रभावी वापर केल्यामुळे हे नाटक काळं-पांढरं किंवा योग्य-अयोग्य ह्या पातळीवर न राहता आपल्याला एका वेगळ्याच प्रतलावर घेऊन जातं. सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळे ह्या नाटकाविषयी इथे अधिक काही सांगणे इष्ट ठरणार नाही.
प्रकाश बोर्डवेकर लिखित ह्या नाटकाची रंगावृत्ती तयार केलीय ती प्रख्यात नाटककार सुरेश जयराम यांनी. सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे यांनी सगळ्या शक्यता गृहीत धरून हे नाटक बसवलंय. अनपेक्षित वळणं घेत, प्रेक्षकांचे काही आडाखे मुद्दामहून बरोबर ठरवत तर काही आडाखे चुकवत, प्रसंगी नाटय़पूर्ण कलाटणी देत आणि कधीकधी तर दोन परस्परसंबंध नसलेल्या गोष्टी एका समांतर रेषेत आणून पुन्हा एकमेकांपासून विभक्त करत प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवण्यासाठी तयार केलेला हा चकवा आहे. ह्या नाटकात रहस्यभेद नाही. ज्या गोष्टी रहस्य म्हणून वापरायच्या आहेत त्या सुरुवातीपासूनच एकएक करत उघड केल्या जातात आणि त्या उघड झाल्यानंतर पुन्हा यू-टर्न घेऊन गुलदस्त्यात जातात. सर्व घटना सुसंगतवार लावण्यासाठी प्रेक्षकांना पुरेसा वेळ दिला जातो आणि नंतर 180 डिग्रीच्या कोनात वळून त्यांचा बुद्धिभ्रम केला जातो. ही रानभूल अगदी नाटक संपेपर्यंत अशीच राहते.
अदिती सारंगधर आणि आस्ताद काळे ह्या दोघांनी लेखक, दिग्दर्शकाच्या मेहनतीला जबरदस्त साथ दिली आहे. त्यांची अफाट ऊर्जा आणि रंगभूमीवरचा वावर वाखाणण्याजोगा आहे. प्रयोग करताना कलाकारांची नक्की दमछाक होत असणार, असं समोर बसलेल्या प्रेक्षकाला वाटायला लावणारा हा परफॉर्मन्स आहे. सस्पेन्स थ्रिलर नाटकासाठी आवश्यक तो नाटय़परिणाम साधणारी प्रकाशयोजना आणि पार्श्वसंगीत इथे मौजूद आहेच.
नुकताच ह्या नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोग मा. दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात साजरा झाला. रहस्यमय नाटकाचे शंभर प्रयोग होणं ही कौतुकास्पद गोष्ट म्हणता येईल. नाटकाचे निर्माते अजय विचारे आणि सहनिर्माते अभय भावे व शरद रावराणे ह्यांचे अभिनंदन. एक नेटका प्रयोग पाहिल्याचे समाधान देणारा हा थरारक चकवा तुम्ही एकदा तरी अनुभवावा असा आहे.